Pankaja Munde | (Photo Credit - Facebook)

Pankaja Munde Shiv Shakti Parikrama Yatra: भाजप नेत्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या सक्रीय झाल्या होत्या. दोन-तीन महिने राजकारणापासून त्या अलिप्त झाल्या होत्या. प्रदीर्घ विश्रांतीनंतर त्यांनी शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरु केली. ज्याचा परळी येथे काल समारोप झाला. या वेळी त्यांनी उपस्थितांना संबोधीत केले. उपस्थितांचे प्रेम पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. दरम्यान, आपल्या भाषणात त्यांनी काही विधाने केले त्यावरुन राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. अनेकांनी पंकजा मुंडे यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे की, माझा कोणत्याही आरक्षणास विरोध नाही. मी पूर्णपणे वंचितची लढाई लढते आहे. मी मराठा समाजाला जर असूरक्षीत वाटत असेल तर त्यांची आरक्षणाची मागणी रास्त आहे. मी या आधीही मराठा समाजासाठी आंदोलने केलेली आहे. मात्र, आरक्षणाची चर्चा करताना मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लावून देऊ नये. आम्ही ते होऊ देणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे की, परीक्रमा करताना लोकांचे मिळालेले प्रेम पाहून मी भारावून गेले. अनेक लोक मला एका तालुक्याची नेता मानत होते. पण जनतेचे प्रेम पाहता मला लोकांची ताकदही पाहायला मिळाली. सन 2019 मध्ये मी पराभूत झाले. त्यानंतर पक्षाने माझ्यावर राष्ट्रीय जबाबदारी सोपवली. मी त्यांना महाराष्ट्रात काम करण्याबात अनेकदा विनंती केली. मात्र, महाराष्ट्रात माझ्याकडे कोणत्याही प्रकारचे पद नव्हते. त्यामुळे मला काम करता येत नव्हते. मग लोकांची भावना लक्षात घेऊनच मी शिवशक्ती यात्रा काढण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, एकमेकांचे स्वागत करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. राजकारणात कधीही कोणीच कोणाचा कायम शत्रू अथवा मित्र नसतो. त्यामुळे राजकारण हे नेहमी प्रवाही असते. लोकांनी माझा पराभव स्वीकारला नाही. लोक माझ्याकडे पाहूनच माझ्या पक्षाला मतदान करतात. त्यामुळे यापुढे परळीत तिहेरी लढत झाली तरीही त्याचा फायदा आम्हालाच होईल. आम्हालाच मतदान करतील, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. मला कोणालाही विस्थापीत करुन निवडणूक लढवायची नाही. मी जे बोलते ते करुन दाखवते, असेही पंकजा या वेळी म्हणाल्या.