Pandharpur Kartiki Wari 2020: यंदाची पंढरपूर कार्तिकी वारी मर्यादित संख्येतील वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार- विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
Vitthal-Rukmini | Photo Credits: Facebook

Kartiki Ekadashi 2020: कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) यंदा सर्वच सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम अगदी सध्या पद्धतीने साजरे होत आहेत. यंदाची आषाढी वारीही त्याचा भाग होती. अगदी मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला होता. आता वेध लागले आहेत ते कार्तिकी वारीचे (Pandharpur Kartiki Wari). मात्र यंदाची पंढरपूर कार्तिकी वारीही अशीच साजरी होणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार मर्यादित संख्येतील वारकऱ्यांच्या उपस्थितीत कार्तिकी वारी परंपरा यशस्वी व्हावी, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. विधानभवन येथे वारीदरम्यान येणाऱ्या समस्या आणि कोरोना पार्श्वभूमीवर वारीचे नियोजन करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

वारकरी संप्रदायास परंपरेनुसार वारीसाठी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असून, पंढरपूर येथील कार्तिकी वारीसाठी विविध सुविधा आणि सुरक्षेसाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावे असे पटोले म्हणाले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा पंढरपूर येथील कार्तिकी वारी आणि 8 डिसेंबरला होणारी आळंदी वारी ही किमान वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडावी, याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येत आहे. वारीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत वारकऱ्यांच्या पालख्यांसाठी 34 विश्रांतीस्थळांना कायमस्वरुपी जागा मिळावी. यासाठी सर्व्हे करून जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तसेच ज्या मार्गांवरून पालखी जाते, त्या रस्त्यांची डागडुजी विविध रस्ते बांधणी योजनेंतर्गत पूर्ण करावी, दरवर्षी होणाऱ्या वारी व अन्य कार्यक्रमांसाठी न्यायालयाच्या आदेशांच्या अधिन राहून हे कार्यक्रम चंद्रभागेच्या वाळवंटात होतील यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देशही पटोले यांनी दिले. वारीला जाण्यासाठी फड परंपरेच्या दिंड्यांसाठी वारकऱ्यांशी समन्वयसाधून त्यांना एस.टी. महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देण्याचे निर्देशही अध्यक्ष श्री. पटोले यांनी दिले. यात्राकाळात नदीपात्रात वाहते पाणी राहील अशी व्यवस्था व्हावी, मठांची घरपट्टी, पाणीपट्टी यासंदर्भातही चर्चा यावेळी करण्यात आली. (हेही वाचा: Kartiki Ekadashi 2020 Date: यंदा कार्तिकी एकादशी 25 की 26 नोव्हेंबर नेमकी कधी साजरी होणार?)

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विविध समस्या जाणून घेवून वारकरी बांधवांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येत असल्याचे सांगितले.