पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुक 2021 चा ((Pandharpur Mangalwedha Assembly By-Election 2021) आज (रविवार, 2 मे) रोजी निकाल जाहीर होणार आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होईल. या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी 17 एप्रिल रोजी मतदान झाले. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भागीरत भालके (Bhagirath Bhalke) आणि भाजपचे समाधान आवताडे (Samadhan Autade) यांच्या लढत झाली. (Pandharpur Election Result 2021 Prediction: पंढरपूर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काटावर पास तर भाजप थोडक्यात बाद होण्याची शक्यता)
कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक पार पडल्याने विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. मतमोजणी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्क, फेसशिल्ड, पीपीई किट सर्व काही उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसंच मतमोजणी दरम्यान निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
या निवडणूकीत NCP चे भागीरत भालके आणि भाजपचे समाधान आवताडे यांच्यात लढत झाली असली तरी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही लढत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या निवडणूकीसाठी अजित पवार चक्क पाच दिवस पंढरपूर-मंगलवेढ्यात होते. तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील तेथे एकदिवसीय दौरा केला. विशेष म्हणजे या निवडणूकीत मनसे पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठींबा दिला आहे. दरम्यान, वडीलांच्या अचानक निधनामुळे राष्ट्रवादीच्या भागीरत भालके यांच्याकडे झुकलेले माप या दौऱ्यामुळे बदलणार का? हे आजच्या निकालानंतर स्पष्ट होईल.