महाराष्ट्रात गेल्या महिन्यांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. कोकण, सातारा, कोल्हापूर परिसरात तर सतत संततधार सुरु आहे. अशात अनेक ठिकाणी नद्यांच्या पातळीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. कोल्हापूर विभाग आणि पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या (Panchganga River) पाण्याची पातळी पुलावरील धोक्याच्या पातळीकडे जात आहे. राधानगरी धरणातून आणखी पाणी सोडल्यास समस्या आणखी वाढेल.
पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे जात आहे. ही पातळी केवळ एक फुटावर आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी सोमवारी ओलांडली. मंगळवारी रात्रीपर्यंत पाणी पातळी 42 फुटावर पोहोचले. पाण्याची पातळी सतत वाढत राहिल्याने पंचगंगा पुलावरून होणारी रेल्वे वाहतूक असुरक्षित होऊ शकते आणि त्यामुळे रेल्वे प्रशासनाला यावरील रेल्वे वाहतूक स्थगित करावी लागू शकते. या निर्णयामुळे मिरज-कोल्हापूर विभागातील रेल्वे सेवेवर परिणाम होणार आहे. कोल्हापुरात तीन दिवसांपासून पाऊस थांबत नाही. नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. (हेही वाचा: Lonavala Crime: जीव धोक्यात घालून धबधबा परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या 7 पर्यटकांवर लोणावळ्यात गुन्हा दाखल)
पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक एसटी फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुरामुळे अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. प्रशासन सतर्कतेवर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. काही रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले असून काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे. तसेच नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. पुढील काही तास पाऊस असाच सुरू राहिल्यास पाण्याची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. प्रशासन लवकरच जवळपासच्या पूरग्रस्त भागातील रहिवाशांना स्थलांतरित करण्याचे आदेश देऊ शकते. त्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलली जात असून महापालिका प्रशासन दर चार तासांनी संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील संभाव्य पूरप्रवण क्षेत्रांची पाहणी केली.