लोणावळ्यात (Lonavala) धबधबा परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या सात पर्यटकांविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलिसांनी (Lonavala Police) गुन्हा दाखल केला.भुशी धरण (Bhushi Dm) परिसरातील धबधब्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना नुकतीच घडली. या दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले. आदेशाचा भंग केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 अन्वये सात पर्यटकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी या कारवाईबाबत माहिती दिली आहे. (हेही वाचा - Maharashtra Rain Update: शुक्रवारपासून राज्यातील किनारपट्टीवरील पाऊस कमी होण्याचा अंदाज)
लोणावळा पोलिसांची नजर चुकवून पर्यटक धबधब्याच्या परिसरात जाऊन अपघातास निमंत्रण देत आहेत. आंबेगाव येथील डोंगररांगात असलेल्या धबधब्यावर 21 जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास पोलिसांची नजर चुकवून गेलेल्या पाच पर्यटकांवर कारवाई करण्यात आली. भाजे लेणी परिसरातील धबधब्याच्या बाजूला गेलेल्या दोन पर्यटकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत धोकादायक पद्धतीने पर्यटन करणाऱ्या 15 पर्यटकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
लोणावळा शहर, तसेच ग्रामीण भागात पुणे, मुंबईतील पर्यटक मोठ्या संख्येने वर्षाविहारासाठी येतात. पर्यटकांनी आनंद घ्यावा. मात्र, पर्यटन करताना जिवाला धोका होईल, असे कृत्य करू नये. याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत, तसेच पर्यटनस्थळांवर फलक लावण्यात आले आहेत.