महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने पालघर मध्ये काही जण जादुटोणा करत असल्याच्या आरोपाखाली दोघा जणांना अटक झाली आहे. पालघर पोलिसांनी ही कारवाई करत 2 तांत्रिकांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील आणि जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली या गावामध्ये घडला आहे. या ठिकाणाहून एकनाथ शिंदे यांचा फोटो आणि काही सामान देखील पोलिसांना मिळालं आहे.
दरम्यान मीडियाशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी या प्रकारावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'अशा प्रकारामुळे काहीही घडत नाही, लोकांनी त्यावर विश्वास ठेवू नये' असे ते म्हणाले आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार, एका घरात तांदळामध्ये एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून त्यांच्या जीवावर बेतावं अशा काही इच्छा मनात ठेवून 2 मांत्रिक अघोरी प्रथा करत होते. पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली तेव्हा त्यांना या भागातून लिंबू मिरची, मांस (chicken meant), हळद, कुंकू, बुक्का सह काही काळ्या जादूशी निगडीत वस्तू सापडल्या.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन तांत्रिकांची नावं कृष्णा बाळू कुरकुटे आणि संतोष मगरी वर्डी अशी आहेत. सध्या पोलिस या दोघांकडून चौकशीच्या माध्यमातून या प्रकारामागे नेमकी कोण लोकं आहेत याचा तपास करत आहेत. यासोबत त्यांचे फोन रेकॉर्ड्स ताब्यात घेण्याचं काम सुरू झालं आहे अशी माहिती पोलिसांनी इंडिया टुडेसोबत बोलताना दिली आहे.
एकनाथ शिंदे हे निष्ठावंत शिवसैनिकांपैकी एक आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. महाविकास आघाडीमध्ये ते नगरविकास मंत्री म्हणून काम करत आहेत. ठाण्यामध्ये शिंदे यांचा मोठा दबदबा आहे.