महाराष्ट्रातील पालघर (Palghar) मधील बोईसरच्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातील नांदोलिया ऑरगॅनिक केमिकल (Nandolia Organic Chemicals) फॅक्टरीत आज एक दुर्घटना घडली. येथे सायंकाळी झालेल्या स्फोटामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर 3 लोक गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत पालघरचे जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी माहिती दिली. हा स्फोट इतका भीष्ण होता की जवळजवळ 10 किलोमीटर पर्यंत याचा आवाज ऐकू आला होता. स्फोटानंतर कित्येक किमी गॅस गळती झाल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी उच्च अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
नांदोलिया ऑरगॅनिक केमिकल फॅक्टरी येथे झालेल्या अपघातानंतर एकाचा मृतदेह सापडला आहे. 3 लोक जखमी झाले आहेत, तर एक व्यक्ती अजूनही गायब आहे. सध्या बचाव कार्य सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातावेळी सुमारे 14 जण कंपनीत काम करत होते. अग्निशमन दल घटनास्थळ दाखल झाले असून, बऱ्याच प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली गेली आहे. सांगितले जात आहे की, रासायनिक अभिक्रियेमुळे औद्योगिक क्षेत्रातील के टी झोनमध्ये हा स्फोट झाला आहे. (हेही वाचा: मुंबईतील वांद्रे येथील शेर्ले राजन रोडवरील एका इमारतीचा भाग कोसळला; एक जण अडकल्याची शक्यता)
एएनआय ट्वीट -
One person killed, three seriously injured in fire at the factory of Nandolia Organic Chemicals: Palghar Collector Kailas Shinde#Maharashtra https://t.co/Y9DfeTcxmQ
— ANI (@ANI) August 17, 2020
दरम्यान, यावर्षी जानेवारीत पालघर जिल्ह्यातील कोळवडे गावात निर्माणाधीन रसायन कारखान्यात स्फोट झाला होता. या स्फोटामध्ये 7 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 4 जखमी झाले होते. रासायनिक चाचणी दरम्यान हा स्फोट झाला. स्फोट इतका मोठा होता की कारखान्याची इमारत कोसळली होती व त्याचा प्रतिध्वनी पंधरा किलोमीटरपर्यंत ऐकू आला होता.