नाशिक (Nashik) - त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) मार्गावर कारचा टायर फुटल्याने पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या मुलाच्या खाजगी वाहनाला भीषण अपघात झाल्याचे समजत आहे. टायर फुटल्याने कार चालवणाऱ्या डॉक्टर संजय शिंदे यांचे गाडीवरचे नियंत्रण सुटले परिणामी रस्त्यालगतचा बांध तोडून गाडी थेट नाल्यात कोसळली. या मध्ये कारचालक डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे तर गावित यांच्या मुलासह दोघं जण गंभीर जखमी आहेत.
प्राप्त माहितीनुसार, नाशिकहून पालघरमधील मोखाड्याला जाण्यासाठी डॉ. संजय पोपटराव शिंदे, डॉ. जतिन संखे आणि राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित हे आज सकाळी निघाले होते. त्र्यंबकेश्वर पुढील रस्त्यात अंजनेरी येथे अचानक गाडीचा टायर फुटला आणि ही दुर्घटना घडली.
अपघातानंतर संजय शिंदे यांना जबर मार लागला होता. दरम्यान, स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत शिंदे सह रोहित व जतिन यांना गाडी बाहेर काढले. शिंदे यांची अवस्था बघता त्यांना तात्काळ रुग्णालायत नेण्यासाठी स्थानिकांनीच रस्त्यावरून येणारी जाणारी वाहने थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र मदतीच्या अभावे त्यांची अवस्था आणखीनच बिघडत गेली. अखेरीस त्यांना एका गर्भवतीला घेऊन जाणारी नाशिक जिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका दिसली त्यामध्ये टाकून शिंदे यांना हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले मात्र तिथे पोहचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, या भीषण अपघातात अन्य सहप्रवासी डॉ. जतीन संखे आणि रोहित गावित हे देखील गंभीर जखमी झाले आहेत तूर्तास त्यांच्यावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.