पालघर मधून 12 बांग्लादेशी व्यक्तींना अटक; वैध कागदपत्र नसल्याने करण्यात आली कारवाई
प्रातिनिधिक प्रतिमा | (File photo)

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (Citizenship Amendment Act)  देशभरात आंदोलने सुरु असताना महाराष्ट्रातील पालघर (Palghar) जिल्ह्यात 12 बांग्लादेशी व्यक्तींना वैध रहिवाशी कागदपत्रे नसल्याने अटक केल्याचे समजत आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने काल , 16 डिसेंबर रोजी ही कारवाई करत बोईसर (Boisar) या भागातून या बांग्लादेशींना बेड्या ठोकल्या. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक मानसिंह पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सूत्रांकडून या बांग्लादेशींच्या अवैध वास्तव्याची माहिती मिळाली होती, यांनतर याठिकाणी जाऊन पोलिसांनी तपासणी केल्यावर या व्यक्तींकडे कागदपत्र नसल्याचे उघड झाले त्यामुळे अशा प्रकारे अवैध पद्धतीने वास्तव्य करण्यासाठी त्यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार हे 12 जण हे भारताचे रहिवाशी असल्याचा कोणताही पुरावा त्यांच्याजवळ नव्हता त्यामुळे त्यांचे वास्तव्य साहजिकच अवैध ठरते अशा व्यक्तींपासून असणारा धोका लक्षात घेता त्यांना अटक करण्यात आली आहे, याबाबत सविस्तर तपास केल्यावर योग्य टी कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच 35 वर्षीय तस्लिमा रबिउल या बांग्लादेशी महिलेच्या बाबतही असाच प्रकार घडला होता. या महिलेकडे आधार कार्ड असूनही पोलिसांनी तिला अवैध वास्तव्यावरून अटक केली होती. हे प्रकरण कोर्टात दाखल होताच आधारकार्ड हा नागरिकत्त्वाचा पुरावा नसल्याचं सांगत मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाने महिलेला दोषी ठरवले होते. तसेच, भारतामध्ये अवैधपणे प्रवेश आणि वास्तव्य केल्याप्रकरणी एका वर्षाचा तुरूंगवास ठोठावण्यात आला होता. याप्रकरणी पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा सेल डीड असे दस्तावेज कोणत्याही व्यक्तीचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाही ही बाब लक्षात घेतली पाहिजे,' असे न्यायालयानं निकाल देताना स्पष्ट केले होते.