
नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terrorist Attack) महाराष्ट्रातील पाच पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यासह महाराष्ट्रातील काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्याची विनंतीही उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांना केली आहे. या विनंतीला प्रतिसाद देत, केंद्रीय मंत्र्यांनी शिंदे यांना आश्वासन दिले की अडकलेल्या व्यक्तींची यादी मंत्रालयाला दिल्यावर, त्यांना प्राधान्याने मुंबईत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले जातील.
हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांपैकी तीन जण राज्यातील ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली भागातील रहिवासी होते, असे ठाण्याच्या जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी सांगितले. हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने अशी मृतांची नावे आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांपैकी एक, अतुल मोने, भारतीय रेल्वेमध्ये वरिष्ठ विभाग अभियंता होते. या 3 मृतांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या ठाणेकरांना मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत, असेही अधिकाऱ्याने सांगितले.
या हल्ल्यात या मृतांव्यतिरिक्त, महाराष्ट्रातील अनेक पर्यटक जखमी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या घटनेत नागपूरचे आणि पुण्याचे दोन जण जखमी झाले आहेत. पहलगाममध्ये अडकलेल्या पर्यटकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारला दिले आहे. दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांना गोळ्या लागल्या आणि ते सध्या उपचार घेत आहेत. त्यांच्या पत्नी जखमी झाल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील त्यांच्या कुटुंबियांशी फोनवरून बोलून त्यांना राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. (हेही वाचा: Pahalgam Terrorist Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील 67 पर्यटकांचा गट थोडक्यात बचावला; घरी परतण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे मागितली मदत)
संपूर्ण परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे जातीने लक्ष ठेवून आहेत. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती सर्व मदत करण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचित केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ने नागरिकांना आवाहन केले आहे की, पहलगाम येथे आपल्या जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास त्याची माहिती तात्काळ 9372338827 आणि 7304673105 या क्रमांकांवर जिल्हा प्रशासनास कळवावी.
त्याचप्रमाणे श्रीनगरमध्ये पर्यटकांसाठी 24/7 मदत कक्ष सुरू करण्यात आला असून जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात 24 तास कार्यरत असलेला आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि मदत डेस्क स्थापित करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून पर्यटकांना कोणत्याही वेळी मदत मिळू शकेल. त्यांना काही अडचण आल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत ते खालील क्रमांकावर संपर्क साधू शकतात:
दूरध्वनी क्रमांक:
0194-2483651
0194-2457543
व्हॉट्सॲप क्रमांक:
7780805144
7780938397