महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाला नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. सध्या राज्यात ऑक्सिजनची कमतरता आहे, बेड्सची कमतरता आहे. याबाबत केंद्राकडे कळकळीची विनंती करत, ऑक्सिजनचा आवश्यक पुरवठा करण्यात केंद्र सरकारने मदत केली तर राज्य सरकार त्यांच्या पाया पडायला तयार आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी गुरुवारी सांगितले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'लोकांचा जीव वाचवण्यासाठी राज्य सरकार काहीही करण्यास तयार आहे. आम्ही मनापासून विनंती करतो, की राज्याला लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा.’
राजेश टोपे म्हणाले, 'राज्यांमधील ऑक्सिजन वितरणाचे अधिकार केंद्र सरकारच्या हाती आहेत. त्यांनी आपल्या हक्कांचा वापर केला पाहिजे आणि महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजन मिळेल याची काळजी घ्यावी.’ ते पुढे म्हणाले, ‘ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकरना केंद्राने 'ग्रीन कॉरिडोर' उपलब्ध करुन द्यावेत जेणेकरून ते गंतव्य स्थानापर्यंत लवकर पोहोचू शकतील. मी केंद्राला पुन्हा पुन्हा विनंती करीत आहे की त्यांनी महाराष्ट्राच्या ऑक्सिजन स्थितीवर लक्ष द्यावे.’
दुसरीकडे राजेश टोपे म्हणाले की, केंद्र सरकार राज्यांना दररोज रेमडेसिव्हिरची 26,000 इंजेक्शन्स वाटप करीत आहे. मात्र महाराष्ट्रात दररोज 50,000 इंजेक्शन्सची आवश्यकता आहे. त्यामुळे कोरोना संसर्गामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा अधिक पुरवठा व्हावा याबाबत आपण केंद्राला पत्र लिहिणार आहोत. गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी हे औषध फार महत्वाचे आहे त्यामुळे या औषधाचा पुरवठा जास्तीत जास्त होणे गरजेचे आहे. (हेही वाचा: CJI On Coronavirus Situation: देशात राष्ट्रीय आणिबाणी सदृश्य स्थिती, सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस)
ऑक्सिजन, बेड्स आणि रेमडेसिव्हिरच्या उपलब्धतेसह महाराष्ट्र सरकार लसीकरणावरही भर देणार आहे. यासाठी इतर विभागांचे निधी वापरण्याचीही योजना आहे तसेच सरकार परदेशातून उपलब्ध लसींची आयात करण्याच्या विचाराधीन आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मागील 24 तासांत 67,013 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 568 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 62,298 जण बरे झाले आहेत. सध्या राज्यात 6,99,858 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.