अवनी वाघिण (छायाचित्र सौजन्य -ANI)

नरभक्षक वाघिण अवनीला वनविभागाने गोळी घालून ठार केल्यानंतर गावकऱ्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. मात्र या घटनेवर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यावरुन वनमंत्र्यांवरही टीका होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात उडी घेतली आहे. यवतमाळ: दिवाळीचे लाडू 'टी-1 वाघीण' मेल्याच्या आनंदात वाटले, फटाकेही फोडले; नागरिकांकडून पांढरकवडा येथे जल्लोष

वाघिणीचा मृत्यू ही दुर्दैवी घटना असल्याचे ते पत्रकार परिषदेत म्हणाले. वाघिणीच्या मृत्यूमुळे आनंदी होण्याचे कारण नाही. उलट ती दुःखद घटना आहे, असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. वाघिणीने हल्ला केल्यानंतर बचावासाठी मारलेल्या गोळीबारात तिचा मृत्यू झाला हे कारण पुढे आले असताना त्यावेळी नेमकी काय परिस्थिती होती, ते तपासून पाहावे लागेल. त्यामुळे वाघिणीच्या मृत्यूची चौकशी करावी लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगतिले. मात्र बेशुद्ध करुन पकडावे व नंतर तिचे पुनर्वसन करावे असा नियम असल्याने थेट गोळी कशी झाडण्यात आली, याचीही चौकशी करावी लागेल.

अवनी वाघिणीच्या मृत्यूवर केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी आक्षेप घेतला आहे. मेनका गांधी प्राणीप्रेमी असल्याचे सर्वश्रूत आहे. त्यामुळे प्राण्यांचे प्रश्न सुटेपर्यंत त्या पाठपुरावा करत असतात. या प्रकरणी ही त्यांनी तीव्र शब्दात त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि त्या आपण समजून घ्यायला हव्यात, असे फडणवीस म्हणाले.

वाघ जंटलमन असून त्यांच्या क्षेत्रात जावून त्यांना त्रास दिल्यानंतरच ते नरभक्षक बनतात. या वाघिणीच्या बाबतीतही असेच काहीसे झाले असावे, अशी शक्यताही मुख्यमंत्र्यांनी यावेळी वर्तवली.