उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन सापडल्या प्रकरणावरुन एकामागोमाग एक खळबळजनक गोष्टी समोर आणणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. परमबीर सिंह यांनी पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीकडून सचिन वाझे भेटीचा दावा फेटाळण्यात आला आहे. याच पाश्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi) गंभीर आरोप केले आहेत. तसेच राष्ट्रवादीकडून देण्यात आलेली माहिती चुकीची असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील राजकारणात आणखी थिणगी पडण्याची शक्यता आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात गृहमंत्र्यांवर 100 कोटी वसुलीचा आरोप केला. ते सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी परमबीर सिंगचे दावे तथ्यहीन असल्याचे म्हणाले आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादीकडून चुकीची माहिती देण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसेच अनिल देशमुख 15 फेब्रुवारी रोजी होम क्वॉरंटाईन नव्हते. ते एका खासगी विमानाने मुंबईत आले होते. त्या दिवशी ते अनेकांना भेटले होते, असा दावा करतानाच शरद पवार यांना चुकीची माहिती देण्यात आली असून आता देशमुख एक्सपोज झाले आहेत, असेही फडणवीस म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Amruta Fadnavis Slams Bhai Jagtap: अमृता फडणवीस आक्रमक; एकेरी उल्लेख करत भाई जगताप यांना दिला 'हा' इशारा
दरम्यान, फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही फोन टॅपिंगप्रकरणी धक्कादायक आरोप केले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसदर्भातील फोन टॅपिंग प्रकरणाचे सर्व पुरावे मुख्यमंत्र्यांना दिले होते. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. याचसंदर्भात फडणवीस आज दिल्लीला जात आहेत. तसेच केंद्रीय गृह सचिवांना सर्व माहिती देणार असून सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.