कोरोना वायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर सध्या सारा भारत देश जागच्या जागी अडकून पडला आहे. यामध्ये महाराष्ट्रात सध्या सहा लाखाहून अधिक कामगार आणि मजूरांचा समावेश आहे. त्यांच्या राहण्याची, खाण्याची व्यवस्था महाराष्ट्र सरकार कडून केली जात आहे. आता हा कोरोना व्हायरस लॉकडाऊन संपल्यानंतर मजुरांना आपल्या मूळ गावी परतण्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने स्टेशनवरील गर्दी टाळण्यासाठी मुंबई, पुणे शहरातून मजूरांसाठी विशेष ट्रेन चालवाव्यात अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील काही दिवसांपूर्वी मजुरांच्या सोयीसाठी केंद्र सरकारने ट्रेन चालवावी असं म्हटलं होतं.
भारतामध्ये कोरोनाचा धोका पाहता 24 मार्चला लॉकडाऊन जाहीर केला. सुरूवातीला हा 21 दिवसांचा होता. त्यानंतर स्थितीचा आढावा घेऊन तो पुढे अजून 19 दिवसांपर्यंत वाढवला. अचानक लॉकडाऊनची घोषणा झाल्याने अनेक कामगार शहरांमध्येच अडकले आहेत. रोजंदारीवर काम करणार्या या मजुरांच्या सोयीसाठी स्थानिक सरकारला त्यांची जबाबदारी घेण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं होतं. दरम्यान मागील आठवड्यात अचानक वांद्रे स्थानकांत मजुरांनी मूळ घरी जाण्यासाठी ट्रेन सोडणार या आशेने गर्दी केली होती.
Ajit Pawar Tweet
Considering the Centre’s lockdown decision, if rail services resume on May 03, a huge crowd of migrants shall gather to leave for their villages. Have written to the Railway Min. to arrange for special trains from Mumbai & Pune across the nation to avoid any law & order issues.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 23, 2020
महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 5649 इतकी झाली होती. यात नव्याने आढळलेल्या 431 रुग्णांसह आतापर्यंत मृत्यू झालेल्या 269 रुग्णांचाही समावेश आहे. राज्यातील 5649 कोरोना रुग्णांपैकी आतापर्यंत उपचार घेऊन बरे झालेल्या आणि रुग्णालयातून सुट्टी मिळालेल्या रुग्णांची संख्या 789 इतकी आहे.