
सध्या संपूर्ण राज्यावरच दुष्काळाचे (Drought) सावट पसरले आहे. मराठवाडा, विदर्भ या ठिकाणची परिस्थिती तर दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. ही उष्णतेची लाट अजून काही दिवस राहणार असून, यंदा मान्सूनदेखील उशिरा अवतरणार असल्याचे हवामानखात्याने सांगितले आहे. राजधानी मुंबईतही काही दिवसांनी अशीच परिस्थिती निर्माण होणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फारच कमी साठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरले नाही तर त्यांनाही पाणीटंचाईचा (Water Shortage) सामना करावा लागू शकतो.
मुंबईच्या धरणांमध्ये सध्या फक्त 22 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, जास्तीत जास्त जूनपर्यंत तो पुरेल. त्यानंतर मात्र राखीव पाणीसाठ्याचा वापर करावा लागणार आहे. एप्रिल 2019 मध्ये हा साठ 26 टक्के इतका होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीसाठा 17 टक्क्यांनी कमी आहे, असे महापालिकेचे मुख्य जल अभियंता अशोककुमार तवाडिया यांनी सांगितले. (हेही वाचा: ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई; एका हंड्यासाठी महिलांमध्ये मारामारी (Video))
नोव्हेंबर 2018 पासूनच मुंबई शहरामध्ये 10% पाणीकपात सुरू करण्यात आली आहे. तर पाणी पुरवठ्याच्या वेळातही 15% कपात करण्यात आली आहे. सध्या परिस्थिती पाहता भातसा आणि अप्पर वैतरणातील राखीव पाणीसाठा वापरण्याची महापालिकेने परवानगी घेतली आहे. त्यामुळे जास्त पाणीकपात होणार नाही, मात्र मान्सूनचे आगमन लवकर झाले नाही तर मात्र चिंताजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते.