Amazon (PC - Pixabay)

Online Shopping Fraud: आजकाल ऑनलाईन गोष्टी ऑर्डर करण्याचा ट्रेंड बराच वाढला आहे. अगदी सुईपासून ते आयफोनपर्यंत लोक अनेक गोष्टी ऑनलाईन मागवतात. मात्र यामध्ये फसवणूक होण्याचीही दाट शक्यता असते. आता मुंबईच्या (Mumbai) माहीम येथील एका 42 वर्षीय व्यक्तीला ॲमेझॉनवरून (Amazon) ऑर्डर केलेल्या 55 हजार रुपयांच्या स्मार्टफोनऐवजी चक्क चहाचे कप मिळाले आहेत. ग्राहकाने ॲमेझॉनविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) उपक्रमाचे उपअभियंता म्हणून कार्यरत असलेल्या अमर चव्हाण यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले की, त्यांनी 13 जुलै रोजी ॲमेझॉनवरून टेक्नो फँटम व्ही फोल्ड मोबाईल फोन मागवला आणि त्यासाठी 54,999 रुपयांचे ऑनलाइन पेमेंट केले.

त्यानंतर साधारण दोन दिवसांनी या ऑर्डरचे पार्सल आले. पण, जेव्हा त्यांनी पार्सल उघडले तेव्हा त्यांना धक्काच बसला. पार्सलमध्ये मोबाईल फोनऐवजी सहा चहाचे कप होते. यानंतर त्यांनी ॲमेझॉन तसेच विक्री करणाऱ्या कंपनीशी संपर्क साधला, परंतु त्यांना समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर अमर चव्हाण यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात अधिकाऱ्यांसह ॲमेझॉन आणि रिटेलरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणी ॲमेझॉन कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. (हेही वाचा: Subsidised Tomatoes: सर्वसामान्यांना दिलासा! उद्यापासून दिल्ली-एनसीआर, मुंबईमध्ये सुरु होणार 50 रुपये किलो दराने अनुदानित टोमॅटोची विक्री)

याआधीही ॲमेझॉनवर विविध गुन्हे दाखल झाले आहेत. नुकतेच कंपनीच्या वेबसाइटवर हिंदू देवतांच्या चित्रांसह टॉयलेट सीट कव्हर विकण्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर नोएडामध्ये कंपनीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. तक्रारदार विकास मिश्रा यांनी नोएडाच्या सेक्टर 58 पोलीस स्टेशनमध्ये ॲमेझॉन कंपनीवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. अशा प्रकरणांमुळे देशात जातीय तेढ पसरण्याचा धोका असल्याचे तक्रारदाराच्या वतीने सांगण्यात आले.