सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसचे (Coronavirus) प्रस्थ आहे. कोरोनाच्या कचाट्यात देशभरातील अनेक नागरिक सापडले आहेत. तर महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील मुंबई (Mumbai) शहराला कोरोनाचा मजबूत विळखा बसला आहे. लहानांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दरम्यान देशात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही चांगली आहे. मुंबई पालिकेच्या (BMC) सायन हॉस्पिटलमधून (Sion Hospital) अशीच एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. एका महिन्याच्या बाळाने कोविड 19 (Covid 19) वर यशस्वीरित्या मात करुन आपल्या जीवनाची सुरुवात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या या बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले आहे.
कोरोनामुक्त झालेल्या बाळाला त्याची आई वॉर्डमधून बाहेर घेऊन येताच हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, कर्मचारी टाळ्या वाजताना व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यानंतर बाळाचा गोंडस चेहरा पाहायला मिळत आहे. कोरोना मुक्त झालेल्या या बाळाला सर्वांनी आनंदाने निरोप दिला. राज्यातील कोरोना बाधितांचा वाढता आकडा, मृतांची संख्या दिवसागणित वाढत आहे. त्यामुळे नक्कीच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, अवघ्या 1 महिन्याच्या बाळाने कोरोनावर मात केल्याची घटना नक्कीच आनंदाची असून त्यामुळे आशादायी चित्र निर्माण झाले आहे. (मुंबई मधील 10 दिवसांच्या बालकाची कोरोनावर मात; बालकासह आई देखील कोरोनामुक्त)
CNN News18 Video:
#Watch -- Doctors and staffers of BMC-run Sion Hospital clap for a one-month-old baby who fought corona and emerged victorious. The baby was discharged after recovery. #IndiaFightsCOVID19 | #StayHome pic.twitter.com/OxcMhbZJ2u
— CNNNews18 (@CNNnews18) May 27, 2020
यापूर्वी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात 10 दिवसांच्या बाळाने कोरोना विरुद्धची लढाई यशस्वीरित्या जिंकली होती. तर अनेक वृद्धांनी कोरोनावर विजय मिळवला आहे. त्यामुळे कोरोनाला 'घाबरु न जाता सतर्क रहा, योग्य खबरदारी घ्या' या सरकारचे आवाहनाचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.