Representational Image (Photo Credits: File Photo)

मुंबई (Mumbai) येथील सर्वात लहान कोरोना बाधित रुग्णाचा कोरोना विरुद्धचा लढा यशस्वी झाला आहे. 10 दिवसाच्या मुलाने जीवघेण्या कोरोनावर मात केली आहे. 27 मार्च रोजी चेंबूर येथे जन्म झालेल्या बालकास आणि त्याच्या आईस कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आईसह नवजात बालकास कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डिलिव्हरीसाठी या महिलेला चेंबूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील ज्या स्पेशल रुममध्ये त्यांना ठेवण्यात आले होते. तेथे त्यापूर्वी एक कोरोना बाधित रुग्ण अॅडमिट होता. त्यामुळे बाळासह त्या महिलेला कोरोनाची लागण झाली. दरम्यान मुलांच्या वडीलांची चाचणी करण्यात आली होती. मात्र त्यांचे रिपोर्ट्स निगेटीव्ह होते.

चेंबूरच्या M वॉर्डचे सहाय्यक पालिका आयुक्त डॉ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "नवजात बालक आणि आई दोघेही आता सुखरुप असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला  आहे. डिस्चार्ज देण्यापूर्वी त्या दोघांचीही दोनदा कोरोनाची चाचणी केली असून दोन्ही वेळेस रिपोर्ट्स निगेटीव्ह आले आहेत." (मुंबई: चेंबुर मधील नवजात बाळ आणि आईची कोरोना चाचणी कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये निगेटीव्ह)

PIB Tweet:

याबद्दल बोलताना नवजात बालकाचे वडील म्हणाले की, "माझा मुलगा आणि बायको यांनी या भयानक व्हायरसवर मात केली आहे. त्यासाठी मी कस्तूबा हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचा खूप आभारी आहे. त्यांनी दिलेल्या विशेष उपचारांमुळे माझा मुलगा आणि बायको यांना कोरोनावर मात करणे शक्य झाले."

कोरोना व्हायरसच्या या गंभीर संकटाने अनेकांच्या मनात भीती निर्माण केली आहे. तसंच सातत्याने समोर येणारी कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवते. मात्र या चिंतामय वातावरणात ही बातमी दिलासा आणि सकारात्मकता देणारी आहे. तसंच 10 दिवसाचे बाळ कोरोनावर मात करु शकतं तर आपण का नाही, असा विचार केल्यास मनोबल नक्की वाढेल.