Varun Gandhi on Night Curfew: भाजप खासदार वरुन गांधी यांचा योगी सरकारवर निशाणा, 'रात्री जमावबंदी, दिवसभर लाखोंच्या उपस्थितीत रॅली हा निर्णय आकलनापलीकडचा'
Varun Gandhi | (Photo Credits: Facebook)

देशभरात ओमायक्रोन (Omicron) संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केली जात आहे. असे असताना उत्तर प्रदेश राज्यात मात्र आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन लाखोंच्या उपस्थितीत मोठमोठे मेळावे घेतले जात आहे. भाजप खासदार वरुन गांधी (Varun Gandhi) यांनी याच मुद्द्यावरुन आपल्याच सरकारवर निशाणा साधला आहे. रात्रभर जमावबंदी (Night Curfew) लावली जाते आणि दिवसभर लाखोच्या उपस्थितीत मेळावे घेतले जात आहे. हा निर्णय सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडचा असल्याची टीका वरुण यांनी केली आहे. वरुण गांधी हे पाठिमागील काही दिवसांपासून सातत्याने भाजप आणि योगी सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेते.

वरुण गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'रात्रभर कर्फ्यू लावायचा आणि दिवसभर लाखोंच्या संख्येने मेळावे आयोजित करायचे. लोकांना मेळाव्यांना बोलवायचे हे सामान्य नागरिकाच्या आकलनापीकडचे आहे. उत्तर प्रदेशची मर्यादित आरोग्य व्यवस्था डोळ्यासमोर ठेवता आम्हाला इमानदारीने हे निश्चित करावे लागेल की आमची प्राथमिकता ही भयावह अशा ओमायक्रोन प्रसाराला नियंत्रणात ठेवणे हीच असायला हवी. निवडणुकांसाठी शक्ती प्रदर्शन नव्हे.' (हेही वाचा, Uttar Pradesh: वरुण गांधी योगी सरकारविरोधात आक्रमक, ट्विटरवर शेअर केला व्हिडिओ, पोस्ट मधून निशाणा)

देशभरात विविध राज्यांमध्ये कोरोना व्हायरस संसर्ग आणि ओमायक्रोन बाधितांची संख्या पुन्हा एकदा डोके वर काढते आहे. शनिवारपासून उत्तर प्रदेशमध्ये रात्रकालिन जमावबंदी लागू करण्यात आली. ही जमावबंदी रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत असणार आहे. सोबतच विवाह, धार्मिक आणि कौटुंबीक कार्यक्रम, सण उत्सव आदी काळांमध्ये कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक असेल. अशा कार्यक्रमांना जास्तीत जास्त 200 सदस्यच उपस्थित राहू शकतात. 200 लोकांना अशा कार्यक्रमास उपस्थित राहण्यास परवानगी असेल.

ट्विट

उत्तर प्रदेशमध्ये नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच निवडणुका होऊ घातल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाचा मोठा विजय झाला होता. या निवडणुकीत भाजपला 403 पैकी 312 जागा मिळाल्या होत्या. तर समाजवादी पक्षाला 47, बसपाला 19 आणि काँग्रेस पक्षाला केवळ 7 जागा मिळाल्या होत्या.