ओबीसी राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान राज्यभर राबवणार -अनिल महाजन
Anil Mahajan | (Photo Credits- File Photo)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी राजकीय आरक्षण बचावर जनसंपर्क अभियान राज्यभर राबविण्याचा निर्धार ओबीसी जनक्रांती परिषदचे संस्थापक अनिल महाजन यांनी व्यक्त केला आहे. अनिल महाजन यांना ओबीसी नेते म्हणूनही ओळखले जाते. ओबीसी राजकीय आरक्षण बचाव मोहिमीतून जनजागृती करण्यासाठी महाजन हे राज्यभर दौरा काढणार असल्याचे एका पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे. अनिल महाजन हे पाठीमागील पाच वर्षांपासून महाराष्ट्रात ओबीसी समाज जनजागृतीसाठी प्रयत्नशील असल्याचा दावाही या पत्रकात करण्यात आला आहे.

ओबीसी राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान राज्यभर राबवताना समाजातील सर्व ओबीसी घटकांना जोडून घेतले जाईल. त्यासाठी ओबीसी समाजातील सर्व संघटना, संस्थांना एकत्र आणत लढा उभारण्यात येणार असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे. केंद्रात व्ही. पी सिंह यांचे सरकार सत्तेत होते. त्या वेळी मंडल आयोग लागू करण्यात आला. त्या आयोगाने सूचवलेल्या अनेक शिफारशी त्यावेळच्या सरकारने स्वीकारल्या. त्यानुसार ओबीसींना हक्क मिळावेत अशी समाजाची मागणी असल्याचे महाजन यांनी म्हटले.

दरम्यान, ओबीसी राजकीय आरक्षण बचाव जनजागृती मोहीमेसाठी अनिल महाजन हे लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार असल्याचे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. महाजन यांनी या आधीही विविध विषयांवर जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.