नवीन विठ्ठल मूर्ती (संग्रहित-संपादित प्रतिमा)

पंढरपुरातील (Pandharpur) विठ्ठल (Vitthal) अवघ्या महाराष्ट्राचे दैवत, युगानयुगे विटेवर उभा राहून विठूराया भक्तांची गाऱ्हाणे ऐकत आहे. मात्र त्याच्या मंदिरावर सत्ता कोणाची याबाबत न्यायालयात लढाई झाली. कोर्टाने आदेश दिल्यानुसार बडवे-उत्पात समाजाला विठ्ठल मंदिरावरचा ताबा गमवावा लागला होता. त्यानंतर नाराज उत्पात समाजाने रुक्मिणीचे स्वतंत्र मंदिर उभा केले, आता बडवे समाजाकडून विठ्ठलाचेही नवे मंदिर उभा राहिले आहे. म्हणजे आता पंढरीत चक्क दोन विठ्ठल विराजमान आहेत. काल, शुक्रवारी बाबासाहेब बडवे यांनी विठ्ठलाच्या नव्या मूर्तीची स्थापना केली.

पंढरपुरात बडव्यांच्या वाढलेल्या मुजोरीमुळे न्यायालयाने, त्यांचा मंदिरावरील ताबा काढून घेऊन मंदिरात पगारी पुजारी नेमले. ही चीड बडवे समाजाच्या मनात कैक दिवसापासून खदखदत होती, त्यामुळे आता बाबासाहेब बडवे यांनी पंढरपूरमध्येच काळा मारुतीजवळ नवीन विठ्ठल मंदिर उभारले आहे. आपल्या समाजातील मंडळींना उपासना करता यावी यासाठी या मंदिराची स्थापना झाली आहे. पंढरपुरातील एका कारागिराने विठ्ठलाची ही नवीन साडेतीन फुट उंचीची मूर्ती बनवली. काल या मूर्तीची स्थापना करून तिला मूळ विठ्ठलासारखा पेहराव करण्यात आला होता. (हेही वाचा: 'पंढरपूर'च्या विठुरायाचं मंदिर होणार हिरवंगार, भाविकाने केले 350 रोपांचे दान)

मागच्या वर्षी घटस्थापनेच्या दिवशी उत्पात समाजाने रुक्मिणीचे नवे मंदिर उभारले होते. याच धर्तीवर आता नव्या मंदिरात विठ्ठलाची नवी मूर्ती स्थापन झाली आहे. यावेळी ‘हे आमचे खासगी मंदिर असून, याठिकाणी इतरही भाविक येऊ शकतात’, असे बडवे समाजाने लोकमत वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.