No Vaccines, No Alcohol: आता औरंगाबादमध्ये 'नो लस, नो दारू' मोहिमेला सुरूवात, लसीकरण न केलेल्या तळीरामांना बसणार फटका
No Alcohol (Photo Credits: Pixabay)

अँटी कोरोना व्हायरस लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेला गती देण्यासाठी देशातील विविध भागात वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जात आहे.  जागरूकता वाढवण्यासाठी महाराष्ट्राचा (Maharashtra) आरोग्य विभाग (Health Department) सलमान खानसारख्या बड्या स्टार्सना लसीकरण करण्याचे आवाहन करत आहे. अनेक ठिकाणी कडक नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.  औरंगाबादचे जिल्हा दंडाधिकारी सुनील चव्हाण (District Magistrate of Aurangabad Sunil Chavan) यांनी लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी एका वेगळ्या मार्गाची निवड केली आहे. त्यांनी आपल्या जिल्ह्यात नो लस, नो दारू असा आदेश दिला आहे. म्हणजेच ज्या मद्यपींनी लस घेतली नाही, त्यांना आतापासून दारू मिळणार नाही.

जिल्हादंडाधिकारी चव्हाण यांनी दिलेल्या आदेशानुसार दारूची दुकाने, वाईन/बीअर शॉपी, देशी दारूची दुकाने, FL3 धारक दारू विक्रीची ठिकाणे या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. म्हणजेच त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, ते आवश्यक आहे. याशिवाय ग्राहकांसाठीही याबाबत कठोर नियम आहेत. ज्या ग्राहकांनी लसीचा किमान एक डोस घेतला आहे अशा ग्राहकांनाच मद्य विकले जाऊ शकते, अन्यथा त्यांना घरी परत केले जाईल.

याशिवाय आतापासून हॉटेल, रेस्टॉरंट, भोजनालय, ढाबे आणि इतर खाद्यपदार्थ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही लसीकरण पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे. एवढेच नाही तर यानंतर ज्यांना लसीकरण झालेले नाही ते पेट्रोल आणि डिझेलही घेऊ शकणार नाहीत. यामुळे लसीकरण मोहिमेला गती मिळेल, असा दावा जिल्हा दंडाधिकारी सुनील चव्हाण यांनी केला आहे.