
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकतेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नागपूर येथील मुख्यालयाच्या भेट दिली. या भेटीबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. यावर शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टिप्पणी केली होती की, ही मोदींची ‘निवृत्तीची योजना’ असू शकते. ते म्हणाले होते, पंतप्रधान झाल्यानंतर पीएम मोदी यांनी पहिल्यांदाच आरएसएस मुख्यालयाला भेट दिली. याचे काहीतरी महत्त्व असले पाहिजे. पंतप्रधानांनी स्वतः असा नियम बनवला आहे की 75 वर्षे पूर्ण केल्यानंतर कोणीही सत्तेत राहणार नाही. आता हा नियम त्यांनाही लागू होतो. या वक्त्यव्यानंतर महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, भारतीय जनता पक्षात 75 व्या वर्षी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा कोणताही नियम नाही.
ते म्हणाले, ‘उबाठाचे नेते संजय राऊत यांचे विधान ही केवळ राजकीय स्टंटबाजी आहे. 75 वर्षे वयानंतर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी राजकारण सोडावे, असा कोणताही नियम नाही किंवा असा कुठलाही निर्णय झालेला नाही. भाजपच्या कोणत्याही अधिकृत धोरणातही असे म्हटलेले नाही. भारतीय संविधानातही असा कोणताही ठराव किंवा नियम नाही. भाजपचे नेते आदरणीय अटलबिहारी वाजपेयी वयाच्या 79 वर्षांपर्यंत पंतप्रधान होते. तर मोरारजी देसाई (83 वर्षे) आणि डॉ. मनमोहन सिंग तर वयाच्या 81 वर्षांपर्यंत पंतप्रधान होते. पण मानसिक संतुलन बिघडल्याने भाजप द्वेषाची कावीळ झालेल्या राऊतांना हे आठवणार नाही.’
No Retirement At 75 Rule In BJP:
उबाठाचे नेते संजय राऊत यांचे विधान ही केवळ राजकीय स्टंटबाजी आहे. 75 वर्षे वयानंतर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी राजकारण सोडावे, असा कोणताही नियम नाही किंवा असा कुठलाही निर्णय झालेला नाही. भाजपच्या कोणत्याही अधिकृत धोरणातही असे म्हटलेले नाही.
भारतीय संविधानातही असा…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) April 1, 2025
ते पुढे म्हणतात, ‘भारतीय लोकशाहीत पंतप्रधानांनी कधी निवृत्त व्हायचे, हे संजय राऊत यांच्यासारख्या सकाळच्या भोंग्यावर ठरत नाही, तर निवडणुकीतील जनादेशावर आणि लोकांच्या आशीर्वादावर ठरते. पंतप्रधान म्हणून पीएम मोदीजी यांचा कार्यकाळ या देशातील जनता ठरवते, संजय राऊत किंवा विरोधकांना तो अधिकार नाही. 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प पंतप्रधान मोदीजींनी केला आहे. हा संकल्प त्यांच्याच नेतृत्वात पूर्ण केला जाईल.’ याआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सोमवारी असे प्रतिपादन केले होते की, पीएम मोदी, जे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा सत्तेत आहेत आणि या वर्षी सप्टेंबरमध्ये 75 वर्षांचे होतील आणि 2029 नंतरही देशाचे नेतृत्व करत राहतील.