No Mask, No Entry: मुंबईमध्ये मास्क नसल्यास सार्वजनिक परिवहन बसेस, टॅक्सी आणि रिक्षांमध्ये प्रवेश नाही- BMC
Coronavirus | (Photo Credits: PixaBay)

महाराष्ट्राची राजधानी मुंबई (Mumbai) मध्ये सध्या कोरोना विषाणू (Coronavirus) संक्रमित रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. आता तर सरकार लोकल रेल्वे व कार्यालये सुरु करण्याचा विचार करत आहे. मुंबईमध्ये अजूनही कोरोना नियंत्रणात आला नाही, त्यामुळे बीएमसी (BMC) वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. अशात आता बृहन्मुंबई महानगरपालिका ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ हा नियम काटेकोरपणे पाळण्याच्या तयारीत आहे. मुंबईत सर्व सार्वजनिक परिवहन बसेस, टॅक्सी आणि रिक्षांमध्ये प्रवास करण्यासाठी मास्क (Mask) घालणे बंधनकारक असेल.

एवढेच नव्हे तर, दुकाने आणि शॉपिंग मॉल्समध्ये प्रवेश करण्यासाठी देखील मास्क घालणे अनिवार्य असणार आहे. याचा अर्थ असा आहे की, जर एखाद्याने मास्क घातला नसेल तर त्याला सार्वजनिक बस आणि टॅक्सीमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही किंवा दुकाने आणि मॉल्समध्येही परवानगी दिली जाणार नाही. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पीटीआय ट्वीट -

महाराष्ट्र हे कोरोना व्हायरस संसर्गग्रस्त राज्यात सर्वात जास्त प्रभावित राज्य आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक बाधित शहरांमध्ये राजधानी मुंबई देखील आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. आता त्याच्या उल्लंघनावर प्रशासन कडक पावले उचलत आहे. सध्या राज्यामध्ये आर्थिक घडामोडींना वेग आणण्यासाठी सरकार उपहारगृहे उघडण्याच्या तयारीत आहे. यासाठीची मार्गदर्शक तत्वे अंतिम टप्प्यात आहेत. (हेही वाचा: महाराष्ट्र सरकारने जाहीर केल्या नवरात्र 2020 साठी मार्गदर्शक तत्वे; राज्यात गरबा व दांडियाचे कार्यक्रम होणार नाहीत)

दुसरीकडे, खासगी क्षेत्रात कार्यरत (Private Sector Employees) असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुंबई लोकल सेवा वापरुन प्रवास करण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकार त्याबाबत योजना आखत असून ती अंतीम टप्प्यात असल्याचे समजते. मुंबई मिररने याबाबत वृत्त दिले आहे. दरम्यान आज मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या 1,713 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण संक्रमितांची संख्या 2,02,488 वर पोहोचली आहे. आज मुंबईमध्ये 2,319 रुग्ण बरे झाले असून, सध्या 26,001 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.