Eknath Shinde | X @ANI

महाराष्ट्रात मराठी भाषेचीच गळचेपी होत असल्याचा अजून एक प्रकार समोर आला आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला ठाणे मनपाने परिपत्रक काढत मराठी भाषेतून एम ए चं शिक्षण पूर्ण केलेल्यांना यापुढे अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा निर्णय ठाणे महानगर पालिका प्रशासनाने घेतला होता. दरम्यान या निर्णया विरूद्ध सोशल मीडीयातून आणि मनसेच्या आक्रमक भूमिकेसमोर प्रशासन झुकलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री , नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाणे पालिका आयुक्तांना निर्णय रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. एमए केलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

राज्यभर आज मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा केला जात असताना मराठी भाषेतून एमएचे शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना यापुढे अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतल्याने मनसे आक्रमक झाली होती.मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाणे पालिका आयुक्तांच्या कार्यालयात आंदोलन केल्यानंतर काही तासांतच महापालिकेला आपला निर्णय मागे घ्यावा लागला आहे.

एकनाथ शिंदे यांनी घेतली दखल

ठाणे मनपा मध्ये ज्या कर्मचाऱ्यांची वेतवाढ रोखली गेली होती, ती आता पूर्ववत होईल. संबंधित परिपत्रक मागे घेण्याचे निर्देशही ठाणे महापालिका आयुक्तांना दिल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी स्पष्ट केले आहे.  मीडीयाशी बोलताना त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे.