महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी (Tuljapur Temple) मातेच्या मंदिरात दर्शनासाठी जाणार्यांना ड्रेसकोडचं (Dresscode) बंधन घालण्यात आलं होतं. पण हा निर्णय भाविकांना विश्वासात न घेता आणि अचानक लादल्याने काही मागील काही तास मंदिरात गदारोळाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण आता हे निर्बंध मागे घेतले असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. मंदिराच्या प्रवेश द्वारावर भाविकांना हाफ पॅन्ट, बर्मुडा किंवा उत्तेजक कपडे घातल्यास प्रवेश दिला जात नव्हता. काही भाविकांना मंदिराच्या प्रवेश द्वारावरील सुरक्षा रक्षकांनी हटकले होते. पण आता हा नियम मागे घेतला असल्याचं सांगण्यात आलं आहे.
स्त्री- पुरूष सह लहान मुलांना देखील ड्रेसकोडच्या नियमावलीनुसार, मंदिरात जाण्यापासून रोखले होते. यावरून गदारोळ झाल्यानंतर आता तुळजाभवानी मंदिर संस्थांनाचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी नोटीस जारी करत तुळजाभवानी मंदिरामध्ये पूजेसाठी अथवा दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भाविकांना कोणतेही निर्बंध घालण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले आहे. नक्की वाचा: Dress Code For Devotees in Tuljabhavani Temple: बर्मुडा, वनपीस, पॅन्ट शर्टधारींना नो एन्ट्री; तुळजा भवानी मंदिरात भक्तांसाठी ड्रेसकोड .
तुळजापूरच्या मंदिरामध्ये राज्याच्या कानाकोपर्यातून भाविक दर्शनाला येतात. हे देवस्थान साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. देवीचा जागर करण्यासाठी इथे भाविक येतात. सध्या सुट्ट्यांचा काळ सुरू असल्याने अनेक भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहे. पण अचानक नियमावली जारी केल्याने काहींना दर्शनापासून दूर ठेवल्याने त्यांनी नाराजीचा सूर बोलून दाखवला आहे.