भाजपा कार्यकारिणी बैठकीस नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे अनुपस्थित; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधान
Pankaja Munde, Nitin Gadkari, Sudhir Mungantiwar | (Photo credit: Archived, edited and representative images)

महाराष्ट्र भाजप (BJP)  विस्तारित कार्यकारिणीची बैठक आज (रविवार, 21 जुलै 2019) मुंबई येथे पार पडत आहे. या बैठकीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)  आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde)  अनुपस्थित आहेत. त्यामुळे भाजपच्या एका गोटात आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधान आले आहे. या प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे भाजपच्या गोटात सर्वच काही अलबेल चालले नसल्याचीही चर्चा सुरु झाली आहे.

या बैठकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, शिक्षणमंत्री विनोद तावडे,  विधासभा सभापती हरभाऊ बागडे यांच्यासह भाजपचे अनेक महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत.

भाजपच्या या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीस प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीच्या कारणांचा प्रसारमाध्यमांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयाने प्रसारमाध्यमांना सांगितले की, नितीन गडकरी यांचे काही पूर्वनियोजीत कार्यक्रम आहेत. हा कालावधी त्यांच्या जनसंपर्काचा आहे. त्यामुळे सध्या ते जनसंपर्कात व्यग्र आहेत. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते या बैठकी उपस्थित राहू शकले नाहीत. (हेही वाचा, शिवसेना-भाजप युतीवर ठाम पण, संशय कायम; जे. पी. नड्डा यांच्या सूचक वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या)

दरम्यान, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे आज संध्याकाळी या बैठकीस उपस्थित राहणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. तर, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी संपर्कच होऊ शकला नाही. त्यामुळे भाजपच्या या बैठकीस त्या अनुपस्थित राहण्याचे कारण समजू शकले नाही.