'मल्ल्याजी' हे एकवेळ थकबाकीदार असतील पण त्यांचा चोर किंवा फ्रॉड म्हणणं मला उचित वाटत नाही. असे वक्तव्य नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एका कार्यक्रमादरम्यान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 50 वर्ष नियमित कर्ज फेडणारी व्यक्ती एकदा डिफॉल्टर लिस्टमध्ये आल्यानंतर लगेजच त्याला 'चोर' म्हणणं ही मानसिकता मला योग्य वाटत नाही असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. भारतीय उद्योगपती विजय मल्ल्या यांच्यावर 9000 कोटी रुपयांचे कर्ज आहे. ते बुडवून विजय मल्ल्या (vijay Mallya) लंडनमध्ये पळून गेले होते. काही दिवसांपूर्वीच मल्यांचं भारतामध्ये प्रत्यार्पण करण्याला परवानगी मिळाली आहे.
एका कार्यक्रमामध्ये बोलताना गडकरी म्हणाले,"मल्ल्याजी हे थकबाकीदार असतील. मागील 40 वर्ष ते नियमित कर्ज फेडत आहेत. एकदा थकबाकीदार झाल्याने त्याच्या 'चोर' ठपका ठेवणं पटत नाही. काही वर्षांपूर्वी विजय मल्या एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये आले. व्यवसाय म्हटला की चढ उतार होणार. जेव्हा व्यवसायामध्ये अडचणी आल्या तेव्हा कर्ज फेडणं कठीण झाल्याने ते अचानक 'चोर' कसे झाले ? असा प्रश्न नितिन गडकरी यांनी विचारला आहे.
राज्य सरकारच्या ईकाई सिकॉम कंपनीकडून विजय माल्ल्या यांना कर्ज देण्यात आलं होतं. मल्ल्यांनीही ते कर्ज परत केले. अशी माहिती नितीन गडकरी यांनी बोलताना दिली. केंद्र सरकारकडून विजय मल्ल्यांना भारतामध्ये पुन्हा आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशावेळेस केंद्रीय मंत्री असलेल्या नितीन गडकरी यांनी विजय मल्यांबाबत सहानुभूतीपर बोलणं ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.