निसर्ग चक्रीवादळ (Nisarga Cyclone) आज, 3 जून रोजी दुपारी 1 ते 3 च्या दरम्यान किनारपट्टीवरून जाणार असल्याचे अंदाज आहेत. या वादळाने आता मुंबईच्या (Mumbai) दिशेने कूच करायला सुरुवात केली आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातील अलिबाग (Alibaug) येथे हे वादळ धडकणार आहे. तत्पूर्वी या वादळी वाऱ्यांमुळे मुंबईत सुद्धा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. दुपारच्या वेळेत सुद्धा पाऊस कायम असण्याची शक्यता आहे. किनारपट्टीलगत भागात आज समुद्राच्या भरतीमुळे परिस्थीती आणखीन बिघडू शकते. नागरिकांंनी अगदी अत्यावश्यक कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असेही सांगण्यात आले आहे. घरात सुरक्षित असतानाही जर का आज आपत्कालीन परिस्थीती उद्भवली तर स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काय काळजी घ्यावी याबबाबत मुंबई पोलिसांनी माहिती दिली आहे. निसर्ग चक्रीवादळाचे क्षणोक्षणीचे अपडेट जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
मुंबई व आसपासच्या भागात आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महाराष्ट्र मंत्रालय निरीक्षण कक्ष, बीएमसी आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने काही हेल्पलाईन क्रमांक देण्यात आले आहेत. यावर संपर्क साधून तुम्ही मदत मिळवू शकाल.
निसर्ग चक्रीवादळ पार्श्वभूमीवर अशी घ्या खबरदारी
- अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका.
-तुमची आवश्यक आणि महत्वाची कागदपत्रे वॉटर प्रूफ फोल्डर्स मध्ये ठेवून एका विशिष्ट उंचीवर ठेवून द्या.
-घरीच थांबा, अनावश्यक कारणांसाठी बाहेर पडू नका.
-आपत्कालीन प्रथमोपचार किट तयार ठेवा.
-फोन, पॉवर बँक, लॅपटॉप्स चार्ज करून ठेवा.
- टॉर्च तयार ठेवा, मेणबत्त्या सहज सापडतील एवढ्या जवळ ठेवा.
-मुंबई पोलिसांना आपत्कालीन परिस्थितीत 100 क्रमांकावर संपर्क साधा किंवा @mumbaipolice याहॅण्डलला टॅग करून ट्विट करा.
दरम्यान, निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कलम 144 (Section 144) लागू करण्यात आलं आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिस आयुक्तांनी कलम 144 अंतर्गत संचारबंदीचा आदेश जारी केला आहे. वांद्रे- वरळी या भागात वाहनांना सुद्धा परवानगी देण्यात आलेली नाही.