Nightlife | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

‘मुंबई २४ तास’ अर्थातच मुंबईचे रात्रजीवन (Nightlife in Mumbai) संकल्पनेअंतर्गत मुंबई आता खऱ्या अर्थाने 24 तास सुरु राहणार आहे. राज्य सरकारने नुकताच एक निर्णय घेतला आहे, ज्यानुसार मुंबईतील मॉल, मिल कंपाऊंड, उपहारगृह यांच्यासोबत आता चित्रपट आणि नाट्यगृहेही 24 तास सुरु ठेवण्यात येणार आहेत. या आधी रात्री शेवटचा खेळ संपला की, चित्रपट आणि नाट्यगृहे दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या खेळापर्यंत बंद ठेवण्यात येत होती. परंतू, राज्य सरकारच्या निर्णयायनुसार आता ती कायम सुरु ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत 26 जानेवारीपासून ‘मुंबई २४ तास’ ही संकल्पना राबवण्यात आली. या संकल्पनेनुसार अनिवासी भागात असलेले मॉल, मिल कंपाऊंड, उपहारगृह 24 तास सुरु ठेवण्यास प्रायोगिक तत्त्वावर मान्यता देण्यात आली होती. मात्र, नाट्यगृहं ‘दुकाने व आस्थापना अधिनियमा’तून वगळली नव्हती. त्यामुळे या नियमांचे पालन करुन नाट्यगृहं निश्चित वेळेला बंद करावी लागत होती. (हेही वाचा, मुंबई 24x7 ला राज्य मंत्रिमंडळाची मंंजुरी; 27 जानेवारीपासून शहरात 'नाईट लाईफ' सुरू)

‘दुकाने व आस्थापना अधिनियमा’नुसार रात्री शेवटचा खेळ संपल्यानंतर नाट्यगृहं आणि चित्रपटगृह पहाटे 1 वाजता बंद करणं नियमानुसार बंधनकारक आहे. त्यामुळे मुंबई शहरात नाईट लाईफ संकल्पना सुरु करण्यात आली तरी, नाट्यगृह आणि चित्रपटगृहांना यातून सवलत नव्हती. त्यामुळे नाईट लाईफ या संकल्पनेत चित्रपटगृहं या संकल्पनेत येत नव्हती. राज्य सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे या नियमातून चित्रपटगृहे आणि नाटय़गृह यांना वगळण्यात आले आहे. राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यांनी तशी अधिसूचना काढली आहे.

राज्य सरकारने मुंबई नाईट लाईफ हा निर्णय घेतला. त्याला मुंबईकर प्रचंड प्रतिसाद देतील अशी आशा होती. मात्र, मुंबईकरांनी अद्याप तरी त्याला म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नाट्यगृहं आणि चित्रपटगृहं 24 तास सुरु ठेवल्यानंतर तरी या संकल्पनेला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. रात्रीच्या वेळी चित्रपट पाहण्यास तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा फायदा ही संकल्पना अधिक राबविण्यासाठी फायद्याची ठरेल, अशी आशा आहे.