लग्नानंतर झालेल्या छळाला कंटाळून नव विवाहित दाम्पत्याची पैठणमधील जायकवाडी जलाशयात आत्महत्या
Representational Image (Photo Credits: ANI)

पैठणमधील (Paithan) जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) पती-पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली आहे. घरात होणाऱ्या छळामुळे या जोडप्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या जोडप्याने आत्महत्येचे पाऊल उचलले. मृत दाम्पत्याचे मृतदेह जलाशयाच्या पाण्यात सकाळी व दुपारी एका मागोमाग तरंगतांना आढळून आले. या जोडप्याचा अवघ्या सहा महिन्यांअगोदरच विवाह झाला होता. (हेही वाचा - World Suicide Prevention Day 2019: जगभरात दररोज किती लोक आत्महत्या करतात माहिती आहे?)

सचिन विठ्ठलराव लवांडे व किर्ती सचिन लवांडे ( रा. तिसगांव ता.पाथर्डी जि.नगर) अशी त्यांची ओळख असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान, हे जोडपे फिरण्यासाठी म्हणून रविवारी दुपारी घरातून बाहेर पडले होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी गेटजवळ मृत दांपत्याची मोटारसायकल (क्रमांक एम. एच. 16 बी. के. 6953) आढळून आली आहे.

हेही वाचा - आत्महत्या करण्यासाठी व्यक्ती का प्रवृत्त होतो? तत्पूर्वी 'या' काही गोष्टी जरुर लक्षात ठेवा

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोन्ही मृतदेह पैठण येथील रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या जोडप्याचे एकमेकांवर अतूट प्रेम होते. त्यामुळे त्यांनी सोबत मरण्याचा निर्णय घेतला.

एकमेकांचा हात रुमालाने बांधून त्यांनी धरणात उडी घेतली. सकाळी पत्नीचा मृतदेह धरणाच्या पाण्यात तरंगतांना आढळून आला होता. तसेच दुपारी पतीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर हे दोघे पती-पत्नी असल्याचे समोर आले. या दाम्पत्याच्या आत्महत्येमुळे संपूर्ण पैठण शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.