
रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून शेजा-यानेच एका जोडप्यावर कोयत्याने वार केल्याची घटना उघडकीस आली आहे. न्यूज 18 लोकमत ने दिलेल्या वृत्तानुसार, रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील दापोलीतील आंजर्ले भंडारवाडा इथं जागेच्या वादावरून एकाने आपल्या शेजारी राहणाऱ्या पती पत्नीवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. जखमी झालेल्या दाम्पत्याला दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंजर्ले भंडारवाडा येथील प्रभाकर तोडणकर आणि संदीप जाधव यांचं जागेवरून गेले अनेक वर्ष वाद वाद सुरु होता. प्रभाकर तोडणकर यांनी त्यांच्या बागेत माड साफ करण्यासाठी गडी बोलावला होता. तो माड साफ करत असताना या वाडीत संदीप जाधव आले आणि त्यांनी या वाडीतील माडाचे झाप हातातील कोयतीने तोडण्यास सुरू केले तेव्हा तेथे पल्लवी तोडणकर आल्या आणि त्यांनी तुम्ही हे काय करता असं विचारलं असता त्याचा राग संदीप जाधव यांना आला आणि त्याने पल्लवी यांच्या हातावर, कमरेवर कोयतीने वार केले.
हेदेखील वाचा- सोलापूर: दिवाळीत माहेरी आलेल्या विवाहितेचा एकतर्फी प्रेमातून खून
तेवढ्यात प्रभाकर तोडणकर हे पत्नीला सोडवण्यासाठी आले असता त्यांच्या ही डोक्यात संदीप याने कोयत्याने वार केले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पल्लवी तोडणकर आणि प्रभाकर तोडणकर यांना अधिक उपचारासाठी दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रभाकर तोडणकर यांनी संदीप जाधव याच्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून दापोली पोलीस अधिक तपास करत आहेत.