मुंबई: सुप्रिया सुळे यांच्यासोबत दादर रेल्वे स्थानकांत टॅक्सी चालकाचं बेशिस्त वर्तन; RPF ने दंड ठोठावत केली कारवाई
Supriya Sule (Photo Credits: Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना मुंबईतील मध्य रेल्वेच्या (Central Railway) दादर (Dadar) स्थानकात एका मुजोर टॅक्सी चालकामुळे वाईट अनुभव आला आहे. रेल्वेमधून उतरत असताना एक टॅक्सी चालक ट्रेन मध्य घुसखोरी करत चढला आणि त्याने सुळे यांची वाट अडवत गैरव्यवहार केला अशी माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून देत याप्रकरणी रेल्वे मंत्रालयाकडे (Ministry Of Railways) थेट तक्रार केली आहे. कुलजित सिंह मल्होत्रा असे संबंधित टॅक्सी चालकाचे नाव असून त्याला दादर स्थानकात आरपीएफ (RPF) कडून दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकारांनंतर सुळे यांनी जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या निवासस्थानी बाप्पांचे दर्शन घेतले.

"सुप्रिया यांनी ट्विट मध्ये लिहिल्यानुसार, आज दादर स्थानकात त्यांना हा अजब अनुभव आला, कुलजित सिंह मल्होत्रा नामक टॅक्सी चालक अचानक ट्रेनमध्ये घुसून कोणाला टॅक्सी हवी आहे का विचारत ओरडत होता. तसेच त्याने सुप्रिया यांना सुद्धा विचारले, त्याला दोन वेळा सुप्रिया यांनी नकार दिल्यावरही मल्होत्रा त्यांची वाट अडवत होता. यामुळे त्रासलेल्या सुप्रिया यांनी त्याचा फोटो काढायला घेतला, तरीही तो निर्लज्जपणे फोटोसाठी पोज देत उभा होता.या प्रकाराची माहिती रेल्वे मंत्रालयाला देत सुप्रिया यांनी अशा लोकनावर निर्बंध लावण्यासाठी नियम बनवण्याची मागणी केली आहे.

"रेल्वेने कृपया या प्रकरणात लक्ष घालावे, तसेच इतर प्रवाशांना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही याचीही दक्षता घ्यावी. जर दलाली करण्याला कायद्याने परवानगी असेल तर रेल्वे स्थानकं आणि विमनतळांवर त्याची परवानगी नसावी. फक्त अधिकृत टॅक्सी स्टॅण्डवरच परवानगी असावी”. असेही सुप्रिया सुळे यांनी पुढील ट्विट मध्ये म्हंटले आहे.

सुप्रिया सुळे ट्विट

दरम्यान हा प्रकार घडताच सुप्रिया यांनी थेट दादर येथील आरपीएफ कडे तक्रार केली, ज्यांनंतर रेल्वे अधिकारी आणि पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर कारवाई करत त्याला दंड ठोठावला आहे. या दक्षतेसाठी सुप्रिया यांनी आरपीएफचे कौतुक करत आभार मानले आहेत.