Sandip Kshirsagar and Sunil Bhusara (PC - ANI)

आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व उपमुख्यमंत्री पदी अजित पवार (Ajit Pawar) यांचा शपथविधी सकाळीच पार पडला. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांना पक्षाचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी अजित पवार यांनी आम्हाला कोणतीही कल्पना नसताना शपथविधी सोहळ्यात नेण्यात आल्याचे सांगितले आहे. या शपथविधीसाठी राष्ट्रवादीचे 10 ते 12 आमदार उपस्थित होते. परंतु, त्यांना याबाबतीत कोणतीही कल्पना नव्हती, असं शरद पवार यांनी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. (हेही वाचा - अजित पवारांनी आमदारांच्या हजेरीसाठी घेतलेल्या सह्यांच्या पत्राचा गैरवापर केला - नवाब मलिक)

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत शपथविधीला उपस्थित राहिलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बुलडाण्याचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले की, आम्हाला 7 वाजता फोन आला. मी अजितदादांच्या बंगल्यावर गेलो. त्याठिकाणी 8 ते 10 आमदार जमा होते. त्यांच्या बंगल्यावरून आम्हाला राजभवनावर नेण्यात आलं. राज्यपाल निवासस्थानी जाताना आम्हाला काहीच कल्पना देण्यात आली नाही. तेवढ्यात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आले. राज्यपाल उपस्थित झाले आणि शपथविधीला सुरूवात झाली. शपथविधी झाल्यानंतर आम्ही ताबडतोब शरद पवारांच्या निवासस्थानी गेलो. त्यांना घडलेला घटनाक्रम सांगितला. आमचा पाठिंबा केवळ पवार साहेबांनाच आहे. आम्हाला कोणतीही कल्पना न देता हा सर्व प्रकार करण्यात आला.

दरम्यान, बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही आमचा केवळ राष्ट्रवादी आणि शरद पवारांना पाठिंबा असल्याचे सांगितले. तसेच विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांनीही आम्हाला काहीही कल्पना नव्हती. शपथविधी पाहून आम्हाला धक्का बसला, अशा शब्दात त्यांनी पत्रकार परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या.