राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Coronavirus Positive) यांना कोरोना व्हायरस (Coronavirus ) संसर्ग झाला आहे. शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. परंतु काळजीचे कोणतेही कारण नाही. माझ्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी घ्यावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे अवाहनही शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे.
शरद पवार यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल न करता घरीच उपचार सुरु असल्याची माहिती मिळते आहे. शरद पवार यांच्यावर अलिकडेच एक शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर ते प्रदीर्घ काळ विश्रांती घेऊन पुन्हा एकदा सक्रीय झाले होते. शरद पवार यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. चोवीस तास लोकांमध्ये वावरनारा नेता अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे ते नेहमी लोकांमध्ये असतात. वाढत्या वयाचा कोणताही अडसर न येऊ देता ते लोकांना भेटतात. शहरांसोबत ग्रामीण भागातही दौरे काढतात. त्यामुळे त्यांना अशाच कोणत्यातरी वेळी व्हायरसचा संसर्ग झाला असावा असे बोलले जात आहे. (हेही वाचा, COVID-19 Pandemic: युरोपमध्ये कोरोना व्हायरस महामारी अंताच्या दिशेने: WHO)
ट्विट
माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही.
गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 24, 2022
दरम्यान, शरद पवार यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीला आराम पडावा अशी भावना सर्वपक्षीय नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. शरद पवार यांचे चाहते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही शरद पवार यांना लवकर बरे वाटावे आणि ते पुन्हा एकदा सक्रीय व्हावे यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रामुख्याने सोशल मीडियावर शरद पवार यांच्याबाबत कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.