राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांना धमकीचा कॉल आला आहे. "एनसीबीचे झोनल डिरेक्टर समीर वानखेडे यांच्या विरुद्ध बोलू नका, अन्यथा महागात पडेल," अशी धमकी त्यांना फोनवरून देण्यात आली. सातत्याने येणाऱ्या या धमकीच्या फोन्सनंतर त्यांच्या सुरक्षेत तात्काळ वाढ करण्यात आली आहे. तसंच त्यांच्या घरभोवतीची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. (मंत्री Nawab Malik यांचे गंभीर आरोप; NCB ने जारी केली प्रेस नोट, Sameer Wankhede यांचे स्पष्टीकरण- 'सर्व आरोप खोटे, मी त्याचा निषेध करतो')
विशेष म्हणजे हे धमकीचे फोन देशातील विविध राज्यांमधून येत आहेत. आज (22 ऑक्टोबर) सकाळी 7 वाजता त्यांना राजस्थानहून धमकीचा फोन आला होता. नवाब मलिक यांच्या सुरक्षा रक्षकाने हा फोन कॉल उचलला होता. "समीर वानखेडे चांगलं काम करत आहेत. त्यांच्या विरोधात बोलणं बंद करा. अन्यथा महागात पडेल," अशी धमकी त्यांना फोन कॉलद्वारे देण्यात आली. यापूर्वी देखील नवाब मलिक यांना अशाप्रकारचे धमकीचे फोन्स आले होते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणातील एनसीबीच्या कारवाईनंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना आपल्या टीकेचे लक्ष्य केले आहे. वारंवार समीर आणि त्यांच्या कुटुंबियांवर ते निशाणा साधत आहेत. समीर वानखेडे हा बोगस माणूस असून त्याची वर्षभरात नोकरी झाली आणि त्याचा तुरुंगवास निश्चित आहे, असं जाहीर वक्तव्य मलिक यांनी काल केलं. तसंच समीर वानखेडे आणि त्यांची बहिण जास्मीन वानखेडे यांनी फिल्म इंडस्ट्रीकडून दुबई, मालदीवला जाऊन वसुली केल्याचेही ते म्हणाले.
परंतु, हे सर्व आरोप समीर वानखेडे यांनी फेटाळून लावले आहेत. तसंच कुटुंबियांवर होणाऱ्या आरोपांचा मी निषेध करतो, असंही ते म्हणाले. तसंच ते जे म्हणताहेत त्यावेळेस मी दुबईला नव्हतो. मी मालदीवला गेलो होतो. पण परवानगी घेऊन. त्यामुळे मंत्रीपदी असूनही मलिक खोटं बोलत आहेत, असं वानखेडे म्हणाले होते.