Private Detectives - प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit ; Pixabay)

आज नवरात्रीचा (Navratri 2024) नववा दिवस, उद्या देशभरात दसऱ्याचा सण साजरा होईल. देवीच्या उत्सवाचा भाग म्हणून नवरात्रीमध्ये गरबा-दांडिया खेळला जातो. मुंबईसारख्या शहरांमध्ये तर तरुणाईमध्ये गरब्याची मोठी क्रेझ पहायला मिळते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये नवरात्रीत दुष्कृत्यांचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे नऊही दिवस तरुण मुलांचे पालक चिंतेत असतात. यावर उपाय म्हणून आता पालक मुलांवर नजर ठेवण्यासाठी गुप्तहेर (Private Detectives) तैनात करत आहेत. गरबा उत्सव जोरात सुरू असताना, अनेक पालकांद्वारे दांडिया कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या तरुण-तरुणींच्या वर्तनावर बारकाईने नजर ठेवण्यासाठी गुप्तहेर तैनात करण्याचे प्रमाणत वाढले आहे.

रात्रीच्या वेळी गरबा खेळण्यासाठी बाहेर पडणाऱ्या मुलांवर किंवा आपल्या स्वतःच्या जोडीदारावरही लक्ष ठेवण्यासाठी खासगी गुप्तहेरांची मागणी वाढत आहे. आजकाल सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे तरुण मुले-मुली एकमेकांच्या सहज संपर्कात येत आहेत. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून नवीन ओळख झालेल्या मुला-मुलींची माहिती गोळा करण्यासाठी, तसेच आपले पाल्य कोणासोबत दांडिया खेळणार आहे, हे शोधण्यासाठी पालक खासगी गुप्तहेर नेमत आहेत.

तसेच एखाद्या पती-पत्नीला एकमेकांबद्दल संशय असल्यास आणि त्यांच्यापैकी एकजण रात्रीच्या वेळी गरबा खेळण्यासाठी बाहेर पडत असेल, तर अशा व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासाठीही खासगी गुप्तहेरही कार्यरत असल्याचे खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांनी सांगितले. रजनी पंडित यांच्या मते, यंदा गरब्याची क्रेझ थोडी कमी झाल्याचे दिसते. मागील वर्षांच्या तुलनेत यावेळी कमी लोकांनी असाइनमेंट स्वीकारल्या आहेत. (हेही वाचा: Traffic Advisory for Dasara Melava: उद्या मुंबईच्या दादरमध्ये होणार शिवसेना (UBT) चा दसरा मेळावा; मुंबई वाहतूक पोलिसांनी जारी केले निर्बंध, जाणून घ्या पार्किंग व्यवस्था)

मुंबईत सुरू असलेल्या कामांसाठी, खाजगी गुप्तहेर प्रत्येक रात्रीसाठी प्रति व्यक्ती 8,000 ते 10,000 पर्यंत शुल्क आकारत आहेत. मुंबईबाहेर किंवा राज्याबाहेरील गरबा कार्यक्रमांसाठी, दर 10,000 ते 20,000 पर्यंत वाढतात. जर क्लायंटचे मूल गरबा इव्हेंटमध्ये सहभागी होत असेल आणि पासेस क्लायंटने दिलेले नसतील, तर ते पास मिळविण्याची किंमत फीमध्ये देखील जोडली जाते.