राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या आजच्या सुनावणीत या दाम्पत्याला जामीन मिळणार की त्यांची रवानगी पुन्हा एकदा कोठडीत होणार याबाबत उत्सुकता आहे. खासदार नवनीत राणा यांच्यावर 6 तर त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या विरोधात 17 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या दम्पत्याच्या (Rana Couple) जामीन अर्जाला सरकारी वकिलांनी तीव्र विरोध केला आहे. या दाम्पत्याला जामीन मिळाला तर हे दाम्पत्य पुन्हा एकदा राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याची शक्यता नाकारात येत नाही, असे सरकारी वकिलांचे म्हणने आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्याने कारागृहात आपल्याला घरचे जेवण मिळावे असा अर्ज केला होता. मात्र, हा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. एकूण व्यग्र कामकाज पाहता या प्रकरणात या आधी झालेल्या शेवटच्या सुनावणीत मुंबई सत्र न्यायालयाने म्हटले होते की, या प्रकरणाची सुनावणी आम्ही शक्य झाल्यास शुक्रवारी घेऊ. त्यानुसार न्यायालयाने या प्रकरणावर काल (29 एप्रिल) सुनावणी घेतली. या सुनावणीत राणा दाम्पत्याच्या वकिलांकडून बाजू मांडण्यात आली. ही बाजू मांडताना वकील म्हणाले की, राणा पती-पत्नी हे लोकांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत. एक आमदार तर दुसरा खासदार आहे. त्यामुळे प्रतिष्ठीत लोकप्रतिनिधीवर अन्याय होऊ नये. त्यामुळे न्यायालयाला शक्य असेल तर आम्ही युक्तीवादास तयार आहोत, अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली. मात्र, न्यायाधीश राहुल रोकडे यांनी इतरही अनेक महत्त्वाची प्रकरणे आहेत. त्यामुळे त्यांना वेळ देणे आवश्यक आहे, असे सांगत सुनावणी घेण्यास नकार दिला. (हेही वाचा, Mumbai Police: नवनीत राणा यांच्या आरोपानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दाखवला आरसा, थेट व्हिडिओच केला शेअर)
दरम्यान, आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दाम्पत्याच्या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. राज्य सरकारनेही या याचिकेला उत्तर दिले. त्यानंतर आज दुपारी 12 वाजता ही सुनावणी घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आजच्या याचिकेत या दाम्पत्याला जामीन मिळतो काय याबाबत उत्सुकता आहे.