Traffic | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

नवी मुंबईकरांसाठी (Navi Mumbai) एक महत्वाची बातमी आहे. आगामी रस्ते बांधकाम प्रकल्पांमुळे घणसोलीमध्ये 27 जानेवारीपासून पुढील 25 दिवस मोठ्या प्रमाणात वाहतूक वळवण्यात येणार असल्याची घोषणा नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी केली आहे. अश्विनी इन्फ्रा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड द्वारे केल्या जाणाऱ्या विकासकामांमुळे अनेक प्रमुख मार्ग प्रभावित होणार आहेत. याबाबत पोलीस उपायुक्त (वाहतूक) तिरुपती काकडे म्हणाले, नवी मुंबई महानगरपालिकेने (एनएमएमसी) कामाचे कंत्राट दिले असून ते 10० मीटर लांबीचे असून, हे काम 25 दिवसांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

बाधित व बंद होणारे मार्ग:

वाहतूक वळवण्यामुळे प्रभावित होणाऱ्या भागांमध्ये पुढील रस्त्यांचा समावेश आहे: घणसोली गाव ते घणसोली जंक्शन, सदगुरु हॉस्पिटल ते घणसोली सेक्टर 6 आणि घणसोली शेतकरी शाळा ते सेक्टर 6 मार्गे सदगुरु हॉस्पिटलला जोडणारा रस्ता. तसेच जोपर्यंत बांधकाम सुरू होत नाही, तोपर्यंत घणसोली मीनाताई हॉस्पिटल ते घणसोली जंक्शनपर्यंतचे अंडरपास बंद राहणार आहेत.

पर्यायी मार्ग आणि वाहतूक व्यवस्थापन:

प्रवासातील अडथळे कमी करण्यासाठी प्राधिकरणाने पर्यायी मार्ग सुचवले आहेत. घणसोली गाव ते घणसोली जंक्शन दरम्यान प्रवास करणारी वाहने महादेव मंदिर आणि डी-मार्ट मार्गे घणसोली सेक्टर 6 मार्गे जातील. (हेही वाचा: Mumbai Coastal Road: मुंबईकरांसाठी खुशखबर! प्रभादेवी कनेक्टरसह फेब्रुवारीपर्यंत पूर्णपणे खुला होणार कोस्टल रोड; जाणून घ्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये व फायदे)

त्याचप्रमाणे घणसोली सेक्टर 6 मधून जाणारी वाहने सेक्टर 15, 16, 17 आणि 18 मधील डी-मार्टच्या माध्यमातून तळवली गावात वळवण्यात येणार आहेत. घणसोली जंक्शन ते घणसोली गावाकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी नौसील नाका, तळवली गाव किंवा दत्तनगर मार्गे मार्ग देण्यात येईल. रस्ते बांधकामाचे हे काम पुढील 25 दिवस सुरु राहणार असल्याने वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक पोलीसांनी केले आहे.