नवी मुंबई (Navi Mumbai) येथे आपल्या सावत्र अल्पवयीन मुलीवर बलात्काराची (Rape) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे चार वर्षांपासून आपल्या सावत्र मुलीवर बलात्कार करणाऱ्या 42 वर्षीय वकिलाला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेच्या शिक्षिकेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर मंगळवारी आरोपीला अटक करण्यात आली. माहितीनुसार, मे 2020 च्या सुमारास ही गोष्ट सुरू झाली तेव्हा मुलगी 10 वर्षांची होती. मुलीने तिच्या शाळेतील शिक्षिकेला या घटनेची माहिती दिली, त्यानंतर शिक्षिकेने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन या सावत्र वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पीडितेला तिच्या आईला झालेल्या त्रासाबद्दल सांगण्याचे धाडस कधीच झाले नाही. 2018 मध्ये पीडितेच्या आईचे आरोपीसोबत लग्न झाले. त्यानंतर 2020 पासून आरोपीने पिडीत मुलीला तिच्या आवडीचे पदार्थ आणि खेळणी देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यास सुरुवात केली होती. आईला यातील काही सांगू नको, अशी धमकीही तो मुलीला देत असे.
हे कुटुंब सुरुवातीला कामोठे येथे राहत होते आणि नंतर खारघर येथे स्थलांतरित झाले. आरोपीने दोन्ही निवासस्थानी मुलीवर लैंगिक अत्याचार केले. पीडितेची आई जेव्हा कामानिमित्त बाहेर पडायची तेव्हा आरोपी तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. आरोपीला भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पॉस्को) या कलमांखाली अटक करण्यात आली. त्याला आज पनवेल न्यायालयात हजर केले असता 24 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
(हेही वाचा: UP Shocker: घोड्यावर चढण्यापूर्वीच बलात्कार प्रकरणात वराला अटक, उत्तर प्रदेश येथील घटना)
दरम्यान, याआधी ठाणे जिल्ह्यातील एका 44 वर्षीय व्यक्तीला आपल्या अल्पवयीन सावत्र मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. कोर्टाने दोषीला 10,000 रुपयांचा दंडही ठोठावला. विशेष सरकारी वकील संध्या म्हात्रे यांनी कोर्टात सांगितले की, ठाण्यातील मुंब्रा परिसरात राहणाऱ्या आरोपीने 2020 मध्ये पीडित मुलगी सहा वर्षांची असताना हा गुन्हा केला होता. आरोपीने पिडीतेवर कैकवेळा बलात्कार केला होता.