कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घरातूनच ऑनलाईन शिक्षण (Online Education) सुरु आहे. शाळा, महाविद्यालये बंद असल्या कारणाने ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु आहे. यासाठी मुलांना इंटरनेट सुविधा लागते. तसेच सर्वांकडेच कम्युप्टर नसल्याने अनेकांना मोबाईलचा आधार घ्यावा लागत आहे. अशावेळी ऑनलाईन शिक्षण घेण्यात अडथळा येऊ नये म्हणून नवी मुंबई महापालिकेने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोबाइल इंटरनेट कनेक्शन विकत घेता यावं यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला 500 रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
नवी मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, पालिकेतील अनेक विद्यार्थी निम्न-मध्यम वर्गातील कुटुंबातून असून त्यांच्याकडे इंटरनेट कनेक्शन घेण्यासाठी पैसे नाहीत. पालिकेच्या शाळांमध्ये एकूण 40 हजार विद्यार्थी शिकत आहेत. अनेक कुटुंबांकडे संगणक नसून साधा स्मार्टफोन असल्याचं समोर आलं आहे. अनेक पालकांना मोबाइल इंटरनेट घेणं परवडत नसल्याने विद्यार्थी ऑनलाइन क्लाससाठी हजेरी लावू शकत नव्हते ज्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर होत होता असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.हेदेखील वाचा- Maharashtra HSC Board Exam 2021 Cancelled: इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा रद्द; आपत्ती व्यवस्थापन विभागाची घोषणा
या सर्व गोष्टींची दखल घेत पालिकेच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेताना अडचणी येऊ नयेत म्हणून विद्यार्थ्यांना मोबाईल रिचार्जसाठी 500 रुपये देण्याचा निर्णय निर्णय नवी मुंबई महापालिकेकडून घेण्यात आला आहे.
"आम्ही विद्यार्थ्यांना 500 रुपयs देणार आहोत जेणेकरुन किमान तीन महिने त्यांना इंटरनेट मिळेल असं त्यांनी सांगितलं आहे. या पैशांचं वाटप कसं करायचं यासंबंधी पालिका प्रस्तावावर काम करत असून पालकांचा खात्यात हे पैसा जमा करण्याचा विचार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली आहे.