Exam | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेसंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज (3 जून) महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि हित डोळ्यासमोर ठेऊन राज्य शिक्षण विभागाने पाठवलेला प्रस्ताव राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्वीकारला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (Maharashtra Board) शिक्षण मंडळातर्फे घेतले घेण्यात येणारी इयत्ता 12 परीक्षा रद्द (Maharashtra HSC exam Cancelled) झाली आह. राज्य शिक्षण मंडळाने पाठवलेल्या प्रस्तावात विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि हित डोळ्यासमोर ठेऊन इयत्ता 12 वीच्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात असे म्हटले होते. तसेच, राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीतही या परीक्षा रद्द करण्याबाबत चर्चा झाली होती.

इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेबाबत माहिती देताना राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही काल सांगितले होते की, राज्यातील कोरोना स्थिती आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य डोळ्यासोमोर ठेऊन इयत्ता बारावी परीक्षेसंदर्भातील वस्तूस्थिती आम्ही मंत्रिमंडळासमोर ठेवली आहे. तसेच आम्ही आमचे एक म्हणने एका प्रस्तावाच्या आधारे आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवले होते. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागाची येत्या दोन दिवसांमध्ये बैठक होईल. त्यानंतर पुढचा निर्णय जाहीर केला जाईल. (हेही वाचा, TET Qualifying Certificate Validity: मोदी सरकारचा मोठा निर्णय; TET योग्यता प्रमाणपत्राची वैधता आता 7 वर्षावरून आजीवन)

दरम्यान, इयत्ता बारावीची परीक्षा होणार किंवा नाही याबाबत राज्यातील विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक वर्तुळात मोठा संभ्रम होता. या आधी जाहीर झाल्या प्रमाणे ही परीक्षा 23 एप्रिलला होणार होती. परंतू, राज्यात कोरोना व्हायरस संसर्गाचा उद्रेक वाढल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे परीक्षा होणार किंवा नाही याबाबत उत्सुकता होती. दरम्यान, इयत्ता बारावीच्या परीक्षांवरुन राज्यात राजकारणही मोठ्या प्रमाणावर सुरु होते. विरोधी पक्षाने राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती.