Metro | Representational Image | (Photo Credits: PTI)

नवी मुंबई मधील मेट्रो रेलची (Navi Mumbai Metro Rail) ट्रायल रन (Trial Run) यशस्वी झाली आहे. सिडकोने (CIDCO) शुक्रवारी तळोजा डेपो (Taloja Depot) जवळ मेट्रो रेलची ट्रायल घेतली. 850 मीटर लांबीच्या मार्गावर ही ट्रायल रन घेण्यात आली. या ट्रायल रन दरम्यान मेट्रोचा स्पीड 65 किमी प्रति तास ठेवण्यात आला होता, अशी माहिती सिडको अधिकाऱ्यांनी दिली आहे.

नवी मुंबईतील नागरिकांना लवकरात लवकर मेट्रो सेवेचा लाभ घेता यावा, यासाठी सिडकोकडून मेट्रोचे काम पूर्ण करण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. मेट्रो रेलच्या लाईन नंबर 1 वर शुक्रवारी यशस्वीरित्या चाचणी करण्यात आली. या लाईनवर मेट्रो लवकरच सुरु होईल, अशी माहिती सिडकोचे मॅनेजिंग डिरेक्टर संजय मुखर्जी यांनी दिली.

मेट्रोची ट्रायल टेस्टिंग करण्यात आलेली लाईन ही महामेट्रो यांच्याकडून बांधण्यात आली आहे. या मेट्रो मार्गाचे तळोजा डेपो हे मुख्य ऑपरेशनल हब असणार आहे. या मेट्रो मार्गावर एकूण 11 स्टेशन असून 11.1 किमीचा मार्ग असेल. नवी मुंबई मेट्रो मध्ये 6 मार्ग असणार आहेत. यात सी.बी.डी. बेलापूर- खारघर- तळोजा- पेंधर- खांदेश्वर- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांचा समावेश आहे.

मेट्रोचे बांधकाम 1 मे 2011 सुरु झाले असून 2020 पर्यंत हे बांधकाम पूर्ण होईल, असा अंदाज होता. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता बांधकाम पूर्ण होण्यास अजून काहीसा अवधी लागणार आहे. या पूर्ण मेट्रोच्या आराखड्यामध्ये एकूण 3 रेल्वे लाईनवर काम होणार असून याचे एकूण अंतर 106 किमी इतके असणार आहे. यापैकी लाईन नंबर 1 ची टेस्टिंग यशस्वी झाल्यामुळे नवी मुंबई नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.