नवी मुंबई (Navi Mumbai) येथे एका वरिष्ठ कस्टम अधिकाऱ्याची तब्बल 13.50 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने ब्रिटीशकालीन बनावट सोन्याची नाणी विकून ही फसवणूक केली आहे. याबाबत नवी मुंबईतील न्हावा शेवा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार उलवे येथील रहिवासी असून अंधेरी येथील कस्टम कार्यालयात कामाला आहे. 3 जुलै रोजी पीडित उलवे येथे कारचे सर्व्हिसिंग करून घेत असताना एक अज्ञात व्यक्ती त्याच्याजवळ आली.
या व्यक्तीने स्वत:ची ओळख राजू प्रजापती अशी करून दिली. प्रजापतीने पीडितेला सांगितले की त्याच्याकडे काही ब्रिटीशकालीन सोन्याची नाणी आहेत आणि ती विकायची आहेत. आरोपीने काही नाणी कस्टम अधिकाऱ्याला दाखवली. नंतर पिडीतने ही नाणी तपासण्यासाठी एका ज्वेलरी दुकानात दाखवली, जिथे त्याला ही नाणी सोन्याची असल्याचे सांगण्यात आले. पीडितने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये ही माहिती देण्यात आली.
दुसऱ्या दिवशी, पीडित व्यक्ती प्रजापती आणि इतर दोन व्यक्तींना भेटली. यावेळी प्रजापतीने पीडितेला सुमारे 500 नाणी असलेली थैली दाखवली. पीडित व्यक्तीने प्रजापतीला पुन्हा काही नाणी देण्यास सांगितले जेणेकरुन त्यांची सत्यता पडताळता येईल. त्यानंतर पीडितेने ती नाणी ज्वेलरला दाखवली, जिथे पुन्हा खात्री झाली की ती खरी सोन्याची नाणी आहेत.
यानंतर प्रजापतीने 500 नाणी 15 लाखांना विकणार असल्याचे सांगून पीडित व्यक्तीला दुसऱ्या दिवशी भिवंडी येथे भेटण्यास सांगितले. पीडितने 13.50 लाख रुपयांची जुळणी केली व तो 5 जुलै रोजी भिवंडी येथे प्रजापतीला भेटला. उरलेल्या रकमेची व्यवस्था दोन दिवसात करतो असे सांगून, हा व्यवहार झाला. (हेही वाचा: Crime: मालमत्तेच्या वादातून जन्मदात्या आईची हत्या करून मुलाचाही आत्महत्येचा प्रयत्न)
मात्र, यावेळी पीडित पुन्हा नाण्यांची सत्यता तपासण्यासाठी ज्वेलर्सकडे गेला असता, ती खरी नसल्याचे समजले. त्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. पीडितेने ताबडतोब प्रजापतीला फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा नंबर बंद आला. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने पोलिसात जाऊन शनिवारी तक्रार दाखल केली.