मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडने (MRVC) मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या आठ फूट खोल खड्ड्यात पडल्याने एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मानखुर्द येथील महात्मा फुले नगरातील सहा वर्षांचा मुलगा या खड्ड्यात पडला आहे. आयुष राजेश सेगोकर असे या मुलाचे नाव असून तो मित्रांसोबत खेळत असताना त्याच्या राहत्या वस्तीपासून दूर भटकला आणि रेल्वे स्टेशनजवळ खोदलेल्या खड्ड्यात पडला. त्याला खड्ड्यात पडताना पाहणाऱ्या प्रवाशांनी गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांना (जीआरपी) याची खबर दिली आणि त्यांनी त्याला बाहेर काढले. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
वाशी जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांनी सांगितले की, त्या दिवशी रविवार असल्याने परिसरात कामगार नव्हते. या खड्ड्याला संरक्षक कवच नव्हते आणि त्याला कुंपणही नव्हते.’ या घटनेनंतर कामाचे पर्यवेक्षक आणि अभियंता यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हा मुलगा महात्मा फुले नगर येथे आई-वडील आणि बहिणीसोबत राहत होता. त्याचे वडील हॉस्पिटलमध्ये शिपाई म्हणून काम करतात, तर आई गृहिणी आहे. कटारे यांनी पुढे सांगितले की, ‘एमआरव्हीसीने कामाचे कंत्राट देताना कामाची जबाबदारी निश्चित केलेली असते. हे कंत्राट नेमके कोणाला देण्यात आले होते त्यांची अद्याप नावे मिळालेली नाहीत, परंतु आम्ही आयपीसीच्या कलम 304 नुसार दाखल केला आहे.’ (हेही वाचा: Mumbai Accident: रायगड लोकसभा मतदारसंघ समन्वयक संजय कदम यांच्या कारचा अपघात, आयशर ट्रकची धडक)
दुसरीकडे, महाराष्ट्रातील लातूरमध्ये स्विमिंग पूलमध्ये पोहायला गेलेल्या 16 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. मृताच्या वडिलांच्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 304 (अ) अन्वये जलतरण तलावाच्या मालक व व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.