Representational Image (File Photo)

लग्नाचा वाढदिवस (Wedding Anniversary) साजरा करण्याच्या आनंदात स्वत:च्याच बायकोसबोतचा फोटो 'व्हॉट्सॲप डीपी' (प्रोफाइल पिक्चर) म्हणून ठेवणे एका तरुणासाठी चक्क जीवघेणे ठरले. बायकोसोबतचा त्याचा डीपी (Whatsapp Dp Dispute) पाहून त्याची कथीत मैत्रिण इतकी चिडली की, तिने आपल्या भावांना आणि नातेवाईकांना बोलावून या तरुणास बेदम मारहाण केली. या मारहाणीत मार वर्मी लागल्याने या तरुणाची हत्या (Nashik Murder) झाली. नाशिक तालुका पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या विल्होळी येथे हा अतिशय धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणात पोलिसांनी एक महिला आणि पुरुष अशा दोन व्यक्तींना अटक केली आहे. त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे.

मंदिर परिसरात आढळला मृतदेह

नाशिक तालुक्यातील विल्होळी गावातील जैन मंदिर परिसरात सुरज काशीनाथ घोरपडे (वय 39, रा. सातपूर) या इसमाचा मृतदेह 13 मे रोजी सकाळी आढळून आला. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, सुरज याच्या भावाने नाशिक पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञाताविरोधता गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. (हेही वाचा, Nashik Double Murder: दुहेरी हत्याकांडाने नाशिक शहर हादरले! आंबेडकरवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश जाधव आणि त्यांच्या भावाची चाकूने वार करून हत्या)

संशयितांना अटक आणि हत्येचा उलघडा

नाशिक शहर पोलिसांनी वरिष्ठांनी दिलेल्या सुचनेवरुन संशयावरुन तपास सुरु केला. दरम्यान, खबरींकडून मिळालेल्या माहितीवरुन माग काढत पोलिसांनी त्र्यंबकेश्वरमध्ये सापळा रचला आणि संशयित इंदू विजय साळवे हिच्यासह तिचा भाऊ शशिकांत उर्फ नाना रामदास गांगुर्डे (27, संघर्षनगर, विल्होळी) या दोघांना अटक अटक केली. दोघा संशयितांना बुधवारी (दि. 14) दुपारी जिल्हा न्यायालयात हजर केले त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कोठडीत झालेल्या चौकशीत धक्कादायक माहिती पुढे आली.

प्राप्त माहितीनुसार, मृत सुरज याचे हातावरचे पोट होते. तो मोलमजुरी करुन आपला चरितार्थ चालवत असे. पाठिमागील चार वर्षांपासून तो आणि संशयीत आरोपी इंदू साळवे परस्परांच्या संपर्कात होते. दरम्यान, 10 मे रोजी सुरज याच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्याने आपल्या बायकोचा फोटो 'व्हॉट्सअॅप डीपी' (प्रोफाइल पिक्चर) म्हणून ठेवला. त्याचा राग आल्याने इंदू साळवे हिने फोन करुन सुरज याच्याशी वाद घातला. त्यानंतर चिडलेल्या इंदूची समजूत काढण्यासाठी तो तिच्या विल्होळी येथील घरी 11 व 12 मे रोजी पोहोचला. दरम्यान, इंदू आणि तिच्या भावांनी त्याच्यासोबत वाद घालत त्याला जबर मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याने ते घाबरले आणि त्यांनी त्याची पत्नी आणि कुटुंबीयांच्या परस्परच मृतदेहाची विल्हेवाट लावली. या प्रकारामुळे नाशिक आणि परिसरात खळबळ उडाली आहे.