Onion Price Hike: निर्यातबंदी उठताच कांद्याचे भाव वाढले, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा
Onion Market (Pic Credit - All India Radio News Twitter)

गेल्या आठवड्यातच केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतला. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. निर्यातबंदी उठताच कांद्याचे भाव तब्बल 500 रुपयांनी वधारले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. लोकसभा निवडणूकीच्या काळात शेतकऱ्यांच्या नाराजीचा सामना करावा लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कांद्याला चांगला भाव मिळत आहे. निर्यातबंदी हटवल्याने कांद्याचे भाव प्रतिक्विंटल 500 रुपयांनी वधारले आहेत. सरकारने शुक्रवारी कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावले आहे. यासोबतच सरकारने 31 मार्च 2025 पर्यंत देशी हरभऱ्याच्या आयातीवर शुल्कातून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा - Onion Export: केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी, उत्पादकांना मोठा दिलासा)

गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लागू केलेली होती. याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत होता. कांद्याचे भाव झपाट्याने खाली आल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता.  आता केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी हटवून 1 मॅट्रिक टन कांद्यासाठी 550 डॉलर्स निर्यात मूल्य निश्चित केलं आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यासोबतच देशातून कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क भरावे लागणार आहे. ही अधिसूचना 4 मे पासून लागू झाली आहे. सरकारने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क देखील लागू केले होते, जे 31 डिसेंबर 2023 पर्यंत वैध होते. यासोबतच सरकारने 31 मार्च 2025 पर्यंत देशी हरभऱ्याच्या आयातीवर शुल्कातून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.