
महाराष्ट्रामध्ये ओमिक्रॉनचा (Omicron) वाढता धोका पाहता आता प्रशासकीय स्तरावर पावलं उचलण्यास सुरूवात झाली आहे. नाशिकमध्ये पहिला ओमिक्रॉन बाधित रूग्ण आढळल्यानंतर आता नवी नियमावली नाशिक (Nashik) शहरासाठी समोर आली आहे. नाशिक मध्ये कोविड 19 लस (COVID 19 Vaccine) जास्तीत जास्त लोकांनी घ्यावी यासाठी कडक निर्बंध लावताना आता सार्वजनिक ठिकाणी लस न घेतलेल्यांना प्रवेश नाही असा नियम लागू झाला आहे. लसीकरणाबाबतचा हा नवा नियम 23 डिसेंबर 2021 पासून लागू होणार आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरजकुमार मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची आज नाशिक शहरातील आढावा घेण्यासाठी एक बैठक झाली आहे. त्यामध्ये लसीकरणाबाबतच्या या नव्या नियमाची चर्चा झाली आहे. काही वेळापूर्वीच भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत हा निर्णय जाहीर केला आहे. नक्की वाचा: Mumbai: शहरात नवं वर्ष 2022 पर्यंत कलम 144 लागू, सुरक्षितेत अधिक वाढ केल्याची माहिती.
काही दिवसांतच नवीन वर्षाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे क्रिसमस पार्टी, न्यू इयर सेलिब्रेशन यांच्या निमित्ताने होणारी गर्दी टाळणारी नवे नियम लागू करण्यात येणार आहेत. नियमांची पूर्तता होत नसेल तर पोलिस कारवाईला सामोरं जाण्यासाठी सज्ज व्हा असा इशाराही देण्यात आला आहे. एखाद्या ठिकाणी विना लसीकरण लोक आढळली तर संबंधित आस्थापनांना जबाबदार धरलं जाईल, असंही भुजबळ यांनी सांगितलं आहे.