राज्यात गेल्या अनेक वेळापासून दडी मारुन बसलेल्या पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यात (Nashik City) मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. पावसामुळे नद्या नाले दुथडी भरुन वाहत असून धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. अशातच नाशिककरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण आता 100 टक्के भरलं आहे. त्यामुळे नाशिककरांचा वर्षभराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला असून शेतीला देखील पाणी उपलब्ध होणार आहे. (हेही वाचा - Maharashtra Rain Alert: मुंबईसह पुणे, ठाणे कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशारा)
नाशिकचे गंगापूर धरण 100 टक्के भरल्याने गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे गोदावरीमधील पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदी काठील परिसरात इशारा हा देण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून त्र्यंबकेश्वर व परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून जिल्ह्यातील लहान मोठ्या धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूरसह कश्यपी, गौतमी गोदावरी आणि आळंदी ही धरणे काठोकाठ भरली आहेत. याशिवाय पालखेड, करंजवण, वाघाड, ओझरखेड, पुणेगाव, दारणा, भावली, वालदेवी, कडवा, नांदूरमध्यमेश्वर, चणकापूर, हरणबारी, केळझर, पुनद ही धरणे देखील ओव्हर फ्लो झाली आहेत. पालखेड धरणातील पाणासाठ्यातही झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे मनमाडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिंडोरी तालुक्यातील पावसामुळे करंजवण धरण संपूर्ण क्षमतेने भरले असून, पालखेड धरण देखील भरण्याच्या मार्गावर आहे.