राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा नाशिक जिल्ह्याला बसला आहे. पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे गेल्या सहा दिवसात नाशिकमध्ये पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे नाशिकमध्ये 23 हजार 699 हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. 467 गावातील 36 हजार 442 शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. अवकाळी पावसात सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला आहे. तब्बल 18 हजार 346 हेक्टवरील कांदा भुईसपाट झाला आहे. शेतात पावसामुळे पाणी साचलंय, त्यामुळे काढणीला आलेला कांदा पाण्यात भिजल्याने सडला आहे. कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. एबीपीमाझाने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
कांद्यासोबतच भाजीपाला, डाळिंब, द्राक्ष आणि आंबा फळाला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. गेल्या सहा दिवसात जिल्ह्यातील 464 हेक्टर वरील आंब्याचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे सुरगाणा आणि पेठ तालुक्यात झाडावरुन आंबे अक्षरशः गळून पडल्याचं चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळत आहे. पंचनामे सध्या सुरु असून प्रत्यक्षात मदत कधी मिळेल याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने कहर केला असून पेठ तालुक्यात धुमाकूळ घातला. पेठ तालुक्यातील आमलोण, अभेटी, खर्डापाडा, शेवखंडी, अभेटी, घनशेत, कुळवंडी आदी परिसराला गारांच्या पावसाने झोडपून काढलं.